नागपूर : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यात भाजपने नागपुरातील उरलेल्या तिन्ही जागांवर उमेदवार जाहीर केले. यात मध्य नागपुरातून प्रवीण दटके, पश्चिममधून सुधाकर कोहळे, उत्तर नागपुरातून मिलिंद माने यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच ग्रामीण मधून काटोल मतदारसंघातून चरणसिंह ठाकुर आणि सावनेर मतदारसंघातून आशीष देशमुख हे विधानभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
वर्सोवातून पुन्हा एकदा भारती लव्हेकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. लातूर शहरमधून अर्चना पाटील चाकूरकर तर चंद्रपूर किशोर जोरगेवार यांना भाजपने संधी दिली आहे. विशेष म्हणजे किशोर जोगरेवार यांनी एकच दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यानंतर 22 उमेदवांची दुसरी यादी जाहीर केली. आता, भाजपने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे, भाजपने 146 उमेदवारांना आत्तापर्यंत मैदानात उतरवल्याचे दिसून आले. भाजपच्या तिसऱ्या यादीत आमदार राम सातपुते यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने माळशिरस विधानसभामधून पून्हा एकदा राम सातपुतेंनाच संधी दिली आहे. शरद पवार गटाच्या उत्तम जानकरांसोबत त्यांची लढत होणार आहे.