Published On : Tue, Nov 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

भाजपचे देशव्यापी ‘सेवा दूत’ अभियान १ डिसेंबरपासून; विदर्भस्तरीय अभ्यासवर्ग उद्या नागपुरात

४,१२३ विधानसभा क्षेत्रांत २५ दिवस राबविणार अभियान; सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर, अमरपाल मौर्य यांची प्रमुख उपस्थिती
Advertisement

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सेवा’ संकल्पनेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे देशव्यापी ‘सेवा दूत’ अभियान राबविण्यात येणार आहे. येत्या १ ते २५ डिसेंबर २०२६ या कालावधीत देशातील ४,१२३ विधानसभा क्षेत्रांमध्ये हे अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नागपुरातील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात विदर्भस्तरीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासवर्गाला राज्यसभा खासदार, भाजप ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी अमरपालजी मौर्य, सहप्रभारी अमित मालवीय, भाजपचे प्रदेश सहसंघटन महामंत्री सतीश धोंड यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय पूर्व विदर्भ संघटनात्मक प्रभारी उपेंद्रजी कोठेकर, पूर्व विदर्भ प्रभारी आमदार प्रवीणजी दटके, नागपूर प्रभारी आमदार परिणयजी फुके, भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, महामंत्री श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, संदीप जाधव, मनीषाताई धावडे आणि संपर्क महामंत्री विष्णू चांगदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या अभ्यासवर्गाला संपूर्ण विदर्भातील अभियान समन्वयक, जिल्हा संयोजक, सेवा दूत विस्तारक, नगराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी आणि जिल्हा महामंत्री सहभागी होणार आहेत.

प्रत्येक विधानसभा क्षेत्रात समन्वयक आणि दोन विस्तारक

Advertisement

अभियानाच्या नियोजनानुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक समन्वयक आणि दोन विस्तारक नियुक्त करण्यात येणार आहेत. समन्वयक म्हणून स्थानिक अनुभवी कार्यकर्त्याची निवड केली जाणार असून विस्तारक अन्य शहरातील किंवा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते असतील. या विस्तारकांना संबंधित विधानसभा क्षेत्रात २५ दिवस निवासी स्वरूपात काम करावे लागणार आहे.

यादरम्यान विविध मंडळांमध्ये प्रत्येकी सुमारे पाच दिवस वास्तव्य करून नागरिकांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे ही विस्तारकांची प्रमुख जबाबदारी असेल.

आरोग्य तपासणीपासून रक्तदानापर्यंत विविध उपक्रम

‘सेवा दूत’ अभियानांतर्गत जनसुनावणी, लाभार्थी संवाद, आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान, नशामुक्ती जनजागृती, डिजिटल साक्षरता आणि शासकीय योजनांच्या नोंदणीसाठी सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

महिलांसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण, युवकांसाठी क्रीडा स्पर्धा तसेच ‘अपना क्षेत्र, अपना गौरव’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि श्रमदानाचे कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत.

शेतकरी, व्यापारी आणि विविध घटकांशी संवाद

अभियानादरम्यान शेतकरी, शिक्षक, व्यापारी, कामगार, महिला बचत गट, युवक मंडळे आणि विविध सामाजिक संस्थांशी संवाद साधण्यात येणार आहे. यातून स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या गरजा आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी जाणून घेतल्या जातील.

तसेच सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांच्या अनुभवांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल जनतेपर्यंत पोहोचविण्यावरही भर दिला जाणार आहे.

विदर्भातील कार्यकर्त्यांना मिळणार मार्गदर्शन

बुधवारी होणाऱ्या विदर्भस्तरीय अभ्यासवर्गात अभियानाची संपूर्ण रूपरेषा, विस्तारकांच्या जबाबदाऱ्या, विधानसभा क्षेत्रनिहाय नियोजन, शासकीय योजनांची माहिती आणि संघटनात्मक समन्वय या विषयांवर प्रमुख मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून विदर्भातील कार्यकर्त्यांना अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिशा दिली जाणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.