नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरण्यात येत आहे.अयोध्येतील राममंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने वातावरणनिर्मिती करण्यात आली होती.
त्याच धर्तीवर आता भाजपाकडून राम नवमीच्या तोंडावर आपल्या उमेदवारासाठी प्रचार तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक बूथवर शंभर ते दीडशे मते वाढविण्याचे टार्गेट पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. हा आकडा गाठण्यासाठी शहरातील शेकडो मंदिरांच्या माध्यमातून भाजपकडून प्रचारावर भर देण्यात येणार आहे.
नागपुरातील सर्व मंदिरांची भाजपकडून यादीच तयार करण्यात आली आहे.लवकरच सर्व मंदिरांसमोर अयोध्येशी निगडित पोस्टर्स लावण्यात येणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
भाजपने प्रत्येक प्रभागातील मंदिरांची यादीच बनविली आहे. एकीकडे शहरातील सहाही विधानसभा मंडळांच्या सर्व प्रभागांमध्ये बूथ चलो मोहीम राबविण्यात येत आहे. तर दुसरीकडे प्रमुख पदाधिकाऱ्यांना मंदिरांमध्येदेखील जाऊन संपर्क करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
रामनवमीसाठी विशेष नियोजन १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असून, १७ एप्रिल रोजी रामनवमी आहे. तसेच हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.त्यामुळे भाजपाकडून लोकसभेतील मतांसाठी रामनवमीच्या दिवशी वातावरणनिर्मिती करण्यावर भर राहणार आहे.