नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीची ‘मतदार हक्क यात्रा’ जोर पकडत आहे. या यात्रेद्वारे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव भाजप, नरेंद्र मोदी सरकार व निवडणूक आयोगावर सतत आक्रमक टीका करत आहेत. सीतामढी येथे गुरुवारी (दि.२८) झालेल्या जाहीर सभेत दोन्ही नेत्यांनी केंद्रावर जोरदार प्रहार केला.
मत घेतल्यानंतर रेशन-आधार हिसकावतील –
सभा संबोधित करताना राहुल गांधींनी भाजपवर थेट आरोप केला. ते म्हणाले, “आम्हाला माहिती आहे, भाजप बिहारमध्ये निवडणुका चोरण्याचा प्रयत्न करत आहे. आधी ते तुमचं मत घेतील, नंतर रेशन कार्ड आणि शेवटी आधारही हिसकावतील. त्यामुळेच आम्ही ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू केली आहे.”
त्यांनी दलित समाजालाही उद्देशून इशारा दिला. “स्वातंत्र्यपूर्वी तुम्हाला मारहाण झाली, अस्पृश्य म्हटलं गेलं. संविधानाने तुम्हाला अधिकार दिले. पण भाजप हे अधिकार काढून घेऊ इच्छिते. ६५ लाख मते कापली गेली, त्यात एकाही श्रीमंताचं नाव नाही. गरीबांची मते चोरली जात आहेत. हा आवाज आम्ही दाबू देणार नाही,” असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला.
भाजप-आरएसएस मतचोर-
राहुल गांधींनी यावेळी आणखी गंभीर आरोप करत म्हटलं की, “कर्नाटकमध्ये आम्ही भाजपने मतं चोरल्याचे पुरावे सादर केले. पुढच्या टप्प्यात मी लोकसभा आणि हरियाणा निवडणुकीतील पुरावेही देशासमोर मांडेन. भाजप आणि आरएसएस मत चोरी करून निवडणुका जिंकतात, हे आम्ही सिद्ध करू,” असे ते म्हणाले.
मोदी राजेशाही आणू पाहतात –
सभेत बोलताना तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. “नितीश कुमार सतत भूमिका बदलतात. अशा नेत्यांकडे बिहार चालवण्याची ताकद उरलेली नाही. बिहारच्या युवकांना रोजगार हवा आहे, पण भाजप आणि त्यांचे सहयोगी लोकशाहीच संपवू इच्छित आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले,नरेंद्र मोदी लोकशाही नष्ट करून देशात राजेशाही प्रस्थापित करू पाहतात. पण बिहार ही लोकशाहीची जन्मभूमी आहे. इथले लोक आपले हक्क हिरावून घेऊ देणार नाहीत. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहोत,असे तेजस्वी यादव म्हणाले.
राजकीय तापमान चढले-
महाआघाडीच्या या स्फोटक आरोपांमुळे बिहार निवडणुकीचं वातावरण आणखी तापलं आहे. भाजप आणि महाआघाडी यांच्यातील शब्दयुद्ध पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.