Published On : Wed, May 26th, 2021

पदोन्नतील आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका दुतोंडी भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांचा आरोप

Advertisement

भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांचा आरोप

नागपूर : पदोन्नतीतील आरक्षणच्या संदर्भात काँग्रेसची भूमिका ही दुतोंडी आहे, असा आरोप भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

पदोन्नतीतील आरक्षणाच्या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व डॅा. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेला ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून उत्तर दिले.

ते म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदोन्नतीतील आरक्षणाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेउन मंत्रिमंडळ उपसमिती ही काँग्रेसच्या आग्रहामुळे तयार करण्यात आल्याचे सांगितले. मागासवर्गीय कर्मचा-यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत राज्य सरकारने अजित पवार यांच्या नेतृत्वात समिती गठीत केली.

काँग्रेसच्या आग्रहामुळे समिती गठीत केली असेल तर समितीचे सदस्य असलेले डॉ. नितीन राउत, वर्षा गायकवाड, के.सी. पाडवी यांनी अनारक्षित प्रवर्गातील अजित पवार यांचे मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या विषयासंदर्भात गठीत समितीचे अध्यक्षपद मान्य केले काय? या सर्व सदस्यांना अजित पवार यांचे मागासवर्गीयांच्या पदोन्नतीविषयामध्ये अजित पवार यांचे नेतृत्व मान्य होते तर मग आता त्यांना त्यांच्या निर्णयाविरुद्ध संघर्षाची भूमिका घेण्याचे वक्तव्य का करावे लागते?

पदोन्नतीच्या आरक्षणासंदर्भात मागासवर्गींयांचे प्रतिनिधीत्व करणा-या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची भूमिका मांडली आहे. मात्र या मुद्द्यावर न्याय मिळावा याकरिता सर्व आरक्षित गटातील हे प्रतिनिधी असलेले सदस्य कठोर भूमिका घेणार का? हा सुद्धा प्रश्न आहे. मागासवर्गीयांच्या हक्कासाठी राज्य सरकारमधून बाहेर पडून काँग्रेस महाआघाडी तोडणार का किंवा उपसमितीचे सदस्य असलेले सर्व आरक्षित गटातील मंत्री आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार का, याबाबत त्यांच्याकडून कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका ही पूर्णत: वांझोटी असून यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे. याउलट महाराष्ट्रातील आरक्षित प्रवर्ग अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील मतदारांची दिशाभूल करण्याचा सुनियोजित डाव आहे, असाही आरोप भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केला.