Published On : Sun, Sep 29th, 2019

शिवसेनेच्या १२६ जागांची मागणी भाजपाने फेटाळली?; युतीबाबत अद्यापही संभ्रम

नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचं ठरलंय म्हणणाऱ्या शिवसेना-भाजपाकडून अद्यापही युतीबाबत अधिकृत घोषणा केली नाही. शिवसेना-भाजपात जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेला १२६ जागा सोडण्याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा नकार आहे. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली. यात निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.

यापूर्वी शिवसेना १२६, भाजपा १४४ आणि मित्रपक्ष १८ असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सांगण्यात येत होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीची बोलणी सुरु आहेत. त्यामुळे युतीत शिवसेनेला किती जागा सोडण्यात याव्यात आणि कोणत्या जागा सुटाव्यात यावरुन अद्यापही दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. अशातच दिल्लीच्या वरिष्ठांनी शिवसेनेला १२४ जागा सोडाव्यात असं सांगितलं असल्याने शिवसेना या जागांवर समाधान मानणार का? हे पाहणं गरजेचे आहे.

तत्पूर्वी शिवसेनेने पक्षातील उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले आहे. घटस्थापनेचा मुहुर्त साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीऔरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

कागलमधून संजय बाबा घाडगे, चंदगडवरुन संग्राम कुपेकर, करवीरमधून आमदार चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ. सुजित मिणचेकर, शाहुवाडी सत्यजीत पाटील, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, शिरुळमधून उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.