Published On : Tue, Dec 10th, 2019

देशात विभाजनकारी मानसिकता भाजप आणत आहे – नवाब मलिक

मुंबई – देशात विभाजनकारी मानसिकता करण्यापलीकडे भाजपाला काही दिसत नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

आज संसदेत नागरिकत्व सुधारणा कायदा पास करण्यात आला. धर्माच्या आधारावर नागरीकत्व कायदा करणं योग्य नाही. आसाम राज्यात बाहेरची लोकं आहेत. नागरिकत्व रजिस्टर झालं पाहिजे. याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये प्रक्रिया सुरू होती.

देशातील मुसलमान घुसखोर आहेत असे वातावरण तयार करुन त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु होता. मात्र १९ लाख लोकांना नागरिकत्व मिळाले नाही हे समोर आले आहे. त्यात १६ लाख हिंदू, ३ लाख मुस्लिम आहेत. आता १६ लाख हिंदू असल्याचे समोर आल्यावर या १६ लाख हिंदूंचे करायचे काय म्हणुन हा कायदा भाजपाने आणला आहे. परंतु त्या- त्या राज्यातील लोक धर्मावर आधारित
हा कायदा स्वीकारणार नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

घटनेत तरतुद असताना धर्माच्या नावावर नागरिकत्व सुधारणा कायदा करणं योग्य नाही. त्यावर संसदेत आम्ही आवाज उठवणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

रिफ्युजी म्हणून स्थान देवू शकतो. परंतु धर्माच्या नावावर नागरिकत्व देणे योग्य नाही. घुसखोरांना नागरिकत्व देवून आणखी वाढ होणार आहे. भाजपाने राजकीय फायदा मिळवण्यासाठी हा नागरीकत्व सुधारणा कायदा आणला आहे. राष्ट्रवादी नक्कीच याचा विरोध करेल असेही नवाब मलिक यांनी
स्पष्ट केले.

शिवसेनेनेही याविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.