Published On : Sat, Aug 24th, 2019

पक्ष बदलाचा बाजार भाजपाने मांडलाय – जयंत पाटील

मुख्यमंत्री गंगाखेडच्या सभेचा फोटो पाठवला आहे ‘उघडा डोळे बघा नीट’ – धनंजय मुंडे

शिवस्वराज्य यात्रेचा आजचा सहावा दिवस…

नव्या स्वराज्याचा नवा लढा…

बीड : अंबाजोगाई दि. २४ ऑगस्ट – पक्ष बदलाचा बाजार भाजपाने सुरु केला आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी अंबाजोगाई येथील जाहीर सभेत केली

वेगवेगळ्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचे प्रकार भाजपकडून सुरु आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

पवारसाहेबांनी सगळं काही दिलं. खुर्चीशिवाय त्यांना कुठेही बसवलं नाही ते लोक पक्ष सोडून गेले आहेत असा समाचार घेतानाच त्यांच्या जाण्याने नवीनांना संधी मिळाली आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

माध्यमात येणार्‍या गोष्टींपेक्षा जमीनीवरील परिस्थिती आज वेगळी आहे याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

पवारसाहेबांसारखा जाणता राजा आहे शिवाय तरुण बहाद्दरांची फळी आमच्याकडे आहे त्यातून आम्ही नवा महाराष्ट्र घडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व्यक्त केला.

पुरपरिस्थिती होती त्यामुळे मी शिवस्वराज्य यात्रेत नव्हतो परंतु परिस्थिती निवळल्यानंतर आलो आहे असेही आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री गंगाखेडच्या सभेचा फोटो पाठवला आहे उघडा डोळे बघा नीट – धनंजय मुंडे

धुळे येथे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेवर त्यांनी टिका केली. ते शिवस्वराज्य यात्रेला प्रतिसाद मिळत नाही म्हणाले. मी गंगाखेड सभेचा फोटो तुम्हाला जे माध्यम आवडते त्यावर टाकला आहे ‘उघडा डोळे बघा नीट’ असे जोरदार प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना अंबाजोगाईच्या जाहीर सभेत दिले.

राज्याचा मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत खोटं बोलत असेल तर यासारखे मोठे दुर्दैव नाही.

खोटं महाराष्ट्राच्या जनतेला बोलू नका. रोजगार देण्यात महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे असं तुम्ही सांगत आहात अहो लाज वाटायला हवी तुम्हाला अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला.

सुरुवातीला नोकरभरतीच्या जाहिराती येत होत्या आणि आज नोकरीतून काढल्याच्या येत आहेत. त्यामुळे विचार करा आता ३७० चा मुद्दा आणतील त्याकडे लक्ष देऊ नका नाहीतर तुमचं काही खरं नाही हे लक्षात ठेवा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

या सरकारला मस्ती आलीय यांची ही मस्ती याच महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

भले हम भुखे पेट क्यो न हो लेकीन हवा के साथ ही रहते है… सध्या सगळे हवेतच आहेत असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

कोहीनुर मिलबाबतचा २४ वर्षाचा व्यवहार आहे मात्र राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ ही मोहीम राबवल्यानंतर कोहिनूर मिलचा विषय आज या ईडीच्या लक्षात आला का? असा सवाल करतानाच दुसरीकडे अजितदादा पवार यांच्यावर राज्य सहकारी बँकबाबत काही तरी चालवले जात आहे. त्याच्याशी काहीही संबंध नाही. अनेक लोक त्यात आहेत परंतु फक्त दादांच्या विषयी का दाखवले जात आहे तर महाराष्ट्रात एकमेव ‘दादा’ आहेत जे दिलेला शब्द पाळतात असा नेता आहे हे डोळ्यात खुपत आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

परळी, केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार करत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही -खासदार डॉ. अमोल कोल्हे

परळी आणि केज मतदारसंघात आमचे आमदार जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही अशी प्रतिज्ञा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अंबाजोगाई येथील जाहीर सभेत केली.

दरम्यान जेव्हा आमदार होतील त्याचवेळी या व्यासपीठावर येवून फेटा बांधेन असेही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केले.

शिवस्वराज्य यात्रेचा आजचा सहावा दिवस असून सकाळी परळी येथील श्री वैजनाथाचे आणि अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी मंदिरात दर्शन घेऊन शिवस्वराज्य यात्रेची केज विधानसभा मतदारसंघातील पहिली सभा पार पडली.

भव्य मोटारसायकल रॅलीने शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत करण्यात आले.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार विक्रम काळे, आमदार सतिश चव्हाण,महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, रेखा फड आदींसह अंबाजोगाई, केज मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.