Published On : Wed, Dec 18th, 2019

भाजप सरकारने शिवस्मारकात पाप केलं… निविदा प्रक्रियेतील भ्रष्ट्राचार व अनियमिततेची चौकशी करा – धनंजय मुंडेंची विधानसभेत मागणी

BJP

Representational Pic

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून सत्तेत आलेल्या तत्कालीन भाजप सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन केलेल्या शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार करण्याचे पाप केले असून यामुळेच नियतीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनांच्या प्रस्तावावर बोलत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये आज सभागृहात आरोप प्रत्यारोपांचा ‘सामना’ चांगलाच रंगला. फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना तीन चाकांचे विमानही असते अशी आठवण करून देत तुम्हाला पुन्हा यायला ५ नाही तर १५ वर्ष वाट बघावी लागेल असा टोलाही लगावला!

पवारांचा नाद करू नका, पवार कळायला १० जन्म अपुरे पडतील!
आज विधिमंडळ कामकाजामध्ये देवेंद्र फडणवीस व आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषणे केली. यावेळी धनंजय मुंडेंनी आपल्याच एका भाषणाचा संदर्भ देत ‘पवारांचा नाद करू नका,’ असे सांगून पवार हा एक विचार आहे तो कळायला दहा जन्म अपुरे पडतील असा टोला फडणवीसांना लगावला.

Gold Rate
13 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,24,100/-
Gold 22 KT ₹ 1,15,400/-
Silver/Kg ₹ 1,80,700/-
Platinum ₹ 52,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विविध विकासकामांना हे सरकार स्थगिती देत सुटले आहे असे म्हणत फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला असता ग्रामविकास विभागामार्फत २५-१५ च्या कामांमध्ये अनियमितता असून पूर्वीच्या सरकारने विकासकामांमध्ये पक्षपाती केला असल्याचा गंभीर आरोपही धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात केला.

शिवस्मारकाच्या कामाची चौकशी करा
पंतप्रधान मोदींना आणून मोठा गवगवा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.

महाविकास आघाडीचे सरकार अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत तर देणारच आहे सोबतच दिलेला प्रत्येक शब्द पाळण्यासाठी कटिबद्ध आहे असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून फसवणूक तर केलीच परंतु ‘भीक नको पण कुत्रं आवर’ या म्हणीप्रमाणे शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला, म्हणूनच भाजपच्या हातून नियतीने सत्ता हिरावून घेतली असे परखड मतही धनंजय मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेवरून केलेल्या टिकेला उत्तर देताना धनंजय मुंडेंनी भाजप नेतृत्वाचे अक्षरशः वाभाडे काढले. भाजपने सत्ता मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासह सर्व सरकारी यंत्रणा वापरल्या म्हणूनच नियतीने १०५ आमदार असूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, असे मत व्यक्त केले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पाळला नाही म्हणूनच लोकशाही मार्गाने महा विकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले असेही धनंजय मुंडे म्हणाले.

‘त्या’ केसेस मागे घ्या… मयतांच्या कुटुंबियांना मदत देणार…
मागील सरकारने मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, कोरेगाव -भीमा दंगल आदी प्रकरणांमध्ये सामान्य नागरिकांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही याप्रसंगी धनंजय मुंडे यांनी केली. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्वांच्या कुटुंबियांना आमचे महा विकास आघाडीचे सरकार आधार देईल असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी बोलताना व्यक्त केला.

आता १५ वर्ष तरी तुम्ही पुन्हा येणार नाहीत…
दरम्यान ‘मी पुन्हा येईन’ वरून आज पुन्हा एकदा सभागृहात जुगलबंदी व शेरोशायरी पाहायला मिळाली…सत्ता पक्षाच्या वतीने धनंजय मुंडे यांनी ‘…. *ये कैचिया खाक हमे रोकेंगी, हम परो से नही, हौसलो से उडा करते है!* ‘ असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर देत आमचे सरकार १५ वर्ष टिकणार असून तुम्हाला पुन्हा येण्यासाठी तेवढी प्रतिक्षा करावी लागेल असा टोलाही फडणवीसांना लगावला.

परळीकरांचे व पवारांचे मानले आभार!
दरम्यान विधानसभेत पहिल्याच भाषणात जोरदार बॅटिंग करत धनंजय मुंडेंनी परळीच्या जनतेने ही संधी मिळवून दिली असल्याचे सांगून परळीच्या जनतेचे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे आभार मानले.

Advertisement
Advertisement