Published On : Mon, Apr 1st, 2024

भाजपाचा स्थापना दिवस उत्साहात; नागरिकांच्या सहभागाने साजरा होणार! – चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Advertisement

भारतीय जनता पार्टीचा ४५ वा स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी राज्यातील प्रत्येक बुथवर उत्साहात व नागरिकांच्या सहभागाने साजरा केला जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. स्थापना दिनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते संकल्प करतील.

प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजपा आघाडीच्या सरकारने मागील १० वर्षांत भारताचा मान-सन्मान व संस्कृती व पंरपरेला जोपासण्याचे अद्वितीय कार्य केले आहे. या कार्यकाळात गरीब, शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास वर्गीयांच्या कल्याणासाठी एतिहासिक कार्य करण्यात आले आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील प्रत्येक कार्यालयात ध्वजारोहन केले जाणार आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते आपल्या घरावर भाजपाचा ध्वज लावतील. पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार आहे. बुथ स्तरावर लाभार्थ्यांशी विशेष संपर्क अभियान राबविले जाणार आहे.

श्री बावनकुळे म्हणाले की, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पक्षाच्या ध्वजासह पदयात्रा व बाईक रॅली काढण्यात येणार आहे. भाजपाचे लोकप्रतिनिधी व समाजातील प्रबुद्ध नागरिकांचा सहभाग असणाऱ्या सभा घेतल्या जातील. यातून मोदी सरकारच्या कामगिरीची चर्चा केली जाईल. भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रदेश, जिल्हा, मंडल स्तरावर योजनाबद्ध पद्धतीने कार्यक्रमाची आणखी करावी, असेही आवाहन श्री बावनकुळे यांनी केले आहे.

कोट
• विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी संपूर्ण देश मोदीमय झाला आहे. ‘फिर एक बार, मोदी सरकार, अबकी बार ४०० पार’ या आवाहनाच्या पूर्ततेसाठी भाजपाचे कार्यकर्ते अथक परिश्रम करण्याचा संकल्प या भाजपा स्थापना दिनानिमित्ताने करतील.
– चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा

Advertisement