अयोध्या: भाजपा प्रभू रामाचे नाव घेऊन सत्तेत आली. मात्र त्यानंतर त्यांना रामाचा पूर्णपणे विसर पडला असल्याचे सांगत भाजपाने प्रभू रामचंद्राची फसवणूक केल्याचा आरोप रामजन्मभूमी मंदिराचे प्रमुख संत आचार्य एस. दास यांनी केला आहे. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते.
भाजपाला 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकायची असल्यास त्यांनी आता राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात करावी अन्यथा आगामी निवडणूक जिंकणे कठीण जाईल, असेही आचार्य दास म्हणाले.
काही तासांपूर्वीच चवानी मंदिराचे महंत परमहंस दास यांनी राम मंदिराचे बांधकाम तातडीने सुरू न केल्यास भाजपाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यानंतर आता राम जन्मभूमी मंदिराचे प्रमुख संत आचार्य दासदेखील या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत.
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले नुकतेच म्हटले होते कि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता राम मंदिर आणि हिंदुत्व हे मुद्दे भाजपाच्या अजेंड्यावर नाहीत. पुढील निवडणूक भाजपा विकासाच्या मुद्यावर लढवेल, असेही नक्वींनी म्हटले होते. त्याचे तीव्र पडसाद सध्या पाहायला मिळत आहेत.
‘त्यांना (भाजपाला) 2019 मध्ये सत्ता राखायची असल्यास, राम मंदिराची उभारणी करावी लागेल. अन्यथा आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू करुन त्यांचा पराभव होईल, याची काळजी घेऊ,’ असा इशारा महंत परमहंस दास यांनी भाजपाला दिला होता.
