Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jun 5th, 2018

  वृक्ष संवर्धनांसाठी नागरिकांचा पुढाकार आवश्यक

  नागपूर : झाडांचे संवर्धन ही काळाजी गरज आहे. वृक्षारोपण करून आपले काम संपत नाही, तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्ष संवर्धन करण्याकरिता नागरिकांचा पुढाकार आवश्यक आहे. तरच हे कार्य यशस्वीपणे राबविण्यात यश येईल, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मनपा मुख्यालयात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त शान्तनु गोयल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, निगम अधीक्षक राजन काळे, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता आर.एस.भूतकर, विद्युत विभागाचे श्री.अनिल मानकर, उपअभियंता राजेश दुफारे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी प्रामुख्याने उपस्थित होते.

  मनपा मुख्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महापौर यांनी प्रत्येकाने एक झाड दत्तक घ्यावे आणि त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन केले. प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्रात आणि परिसरात झाडे लावावी, विद्यार्थीवर्गाने आपला विद्यापीठ परिसर, शाळा, महाविद्यालयाची मैदाने यावर झाडे लावावी व ती जगवावी, अशा सूचना महापौरांनी यावेळी केल्या. यानंतर मान्यवरांनी सहकार नगर घाटाजवळ पोहरा नदीच्या काठावर वृक्षारोपण केले. यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, अग्निशमन समिती सभापती लहुकुमार बेहेते, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका पल्लवी श्यामकुळे, सोनाली कडू, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बुरघाटे, डॉ,सुषमा पनकुले प्रामुख्याने उपस्थित होते. याठिकाणी भारतीय वायूसेना आणि OISCA या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

  यानंतर मान्यवरांनी फुटाळा तलाव येथे वृक्षारोपण केले. त्याठिकाणी सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपेंट या संस्थेच्या वतीने ‘प्लास्टिकमुक्त शहर’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी संस्थेच्या प्रमुख लिना बुधे यांनी महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांना कापडी आणि कागदी पिशव्या भेट स्वरूपात दिल्या. सदर कार्यक्रमप्रसंगी मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, नगरसेविका रुतिका मसराम, नगरसेवक अमर बागडे, याप्रसंगी महापालिकेद्वारे नव्याने तयार करण्यात आलेल्या बोटीची मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा करून त्याचे जलावतरण करण्यात आले.. याप्रसंगी सहायक आयुक्त विजय हुमणे, जयंत पाठक, शुभांगी पडोळे यांच्यासह तलाव बचाव समिती, कन्झुमर जस्टिस कौन्सिल, एअर मेंटेनंन्स कमांड, नीरी, ४ महाराष्ट्रीयन बटालियन एनसीसी (नेव्ही), डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस ऑथॅरिटी, स्वच्छ असोशिएशन, पर्यावरण प्रेरणा विदर्भ, इको फ्रेण्डली लिव्हिंग फाऊंडेशन, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, इक्वि सिटी, नागपूर गार्डन क्लब, आदी संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

  या प्रमुख कार्यक्रमांव्यतिरिक्त नागपूर महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी महानगरपालिकेच्या विविध विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेच्या शाळा, दवाखाने, उद्याने, खुली जागा, नदीच्या काठावर आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. भांडेवाडी डॉग शेल्टर येथे आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह चमूच्या हस्ते, नेहरूनगर झोनअंतर्गत नरसाळा घाट येथे झोन सभापती रिता मुळे आणि सहायक आयुक्त राजेश कराडे यांच्या हस्ते सूर्या फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

  कल्पना नगर मैदान आणि झुलेलाल गार्डन, दयानंद पार्क येथे स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेविका सुषमा चौधरी, गार्गी चोपरा, महेंद्र धनविजय, सहायक आयुक्त हरिश राऊत उपस्थित होते. आसीनगर झोनअंतर्गत झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात सभापती वंदना चांदेकर, नगरसेवक मनोज सांगोळे, जितेंद्र घोडेस्वार, दिनेश यादव, नगरसेविका नसिम बोनो ईब्राहिम खान, सहायक आयुक्त गणेश राठोड उपस्थित होते. आरोग्य विभागाद्वारे सदर आणि महाल येथील रोग निदान केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले. सदर येथील रोग निदान केंद्रात नगरसेवक किशोर जिचकार यांच्या हस्ते तर महाल येथील स्व.प्रभाकरराव दटके रोग निदान केंद्राच्या कार्यक्रमाला नगरसेविका सुमेधा देशपांडे आणि डॉ.नरेंद्र बहिरवार उपस्थित होते. इंदिरा गांधी रोग निदान केंद्र गांधीनगर याठिकाणी धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.अनिल चिव्हाणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

  यानंतर आयसोलेशन हॉस्पीटल आणि पाचपावली सुतिकागृह याठिकाणीदेखील वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिवहन विभागाद्वारे खापरी आणि हिंगणा येथील बस डेपो आणि मोरभवन बस स्थानकावर वृक्षारोपण परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप उपस्थित होते. जलप्रदाय विभागाद्वारे नवेगाव खैरी, पेंच प्रकल्प याठिकाणी जलप्रदाय विभागाद्वारे वृक्षारोपण करण्यात आले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145