नागपूर : शहरातील संघ मुख्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इफ्तार पार्टीला परवानगी नाकारली होती. यावरून नवीन वाद निर्माण झाला होता. मात्र, आता या वादावर राष्ट्रीय मुस्लिम मंचने स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रीय मुस्लिम मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेली संघटना आहे. ‘इस्लाम कोणालाही मुस्लिम व्यक्तींसाठी पार्टी आयोजित करण्यास सांगत नाही. त्यामुळेच राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या महाराष्ट्र विभागाच्या नेत्याने केलेल्या विनंतीमध्येच त्रुटी आहे. तशी माहिती संबंधितांना देण्यात आली आहे,’ असं मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद अफझल यांनी एका इंग्रजी दैनिकाला सांगितले.
गेल्या आठवडयात राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या महाराष्ट्र विभागाचे संयोजक मोहम्मद फारुख शेख यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांच्याकडे स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याची विनंती केली होती. त्यावेळी आरएसएसने स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टी करण्यास नकार केला होता. त्यांनतर या वादाला सुरुवात झाली.
आरएसएस कडून नकार मिळाल्यांनतर मोहम्मद फारुख शेख यांनी नाराजी व्यक्त केली. आरएसएसने इफ्तार पार्टी आयोजित केल्यास यामुळे जगभरात बंधूभावाचा संदेश जाईल, असे मला वाटलं होते , असे शेख म्हणाले. ‘भारतात असहिष्णूता आहे, अशी चर्चा जगात आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा पार्टीचं आयोजन करण्यात गैर काय?,’ असा सवाल शेख यांनी उपस्थित केला. ‘मागील वर्षी आम्ही मोमिनपुरातील जामा मशिदीसमोर इफ्तार पार्टी आयोजित केली. त्या पार्टीत आरएसएस आणि भाजपाचे नेते सहभागी झाले होते,’ असंही शेख यांनी सांगितलं.
या प्रकरणी आरएसएसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले कि, सध्या स्मृती मंदिरात असा कुठलाही कार्यक्रम होऊ शकत नाही. कारण तिथे तिसऱ्या वर्षाचा प्रशिक्षण वर्ग सुरु आहे. आरएसएसने परवानगी नाकारल्यामुळे मोहम्मह शेख यांनी नाराजीचा सूर लावला आहे. त्यांनी शाकाहारी पार्टी आयोजित करण्याची तयारी दाखवली होती. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली.