
नागपूर : नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का परिसरातील शीतला माता मंदिरात घडलेल्या चोरीच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. देवळात चोरी करण्यापूर्वी चोरांनी देवासमोर कान पकडून माफी मागितली आणि त्यानंतर दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केली. हा संपूर्ण प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
माहितीनुसार, शीतला माता मंदिर आणि शिवमंदिराचे पुजारी व व्यवस्थापक जितेंद्र पांडे यांनी २७ जुलैच्या रात्री मंदिर बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात आल्यावर मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता दोन्ही दानपेट्यांचे कुलूप फोडून त्यातील रोकड चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता दोन अज्ञात चोर मंदिरात प्रवेश करताना दिसले. विशेष म्हणजे, चोरी करण्यापूर्वी दोघांनी देवासमोर कान पकडून माफी मागितल्याचेही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी दानपेट्यांचे कुलूप तोडून त्यातील संपूर्ण रोकड चोरून घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची तक्रार मिळताच लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही संशयितांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.




