Published On : Tue, Jul 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात बीआयएसची धडक कारवाई ; बनावट दर्जा चिन्हासह नियमबाह्य प्रेशर कुकर जप्त!

दुकानाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू
Advertisement

नागपूर : ग्राहकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या उत्पादनांविरोधात भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) शहरात मोठी कारवाई केली आहे. तक्रारीच्या आधारे जगन्नाथ बुधवारी रोड परिसरातील बडेवाले मेटल्स या दुकानावर शोध व जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणारे ११ घरगुती प्रेशर कुकर जप्त करण्यात आले.

भारतीय मानक ब्युरोला संबंधित दुकानात भारतीय मानक संस्थेच्या दर्जा चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार १५ जून २०२६ रोजी अधिकाऱ्यांच्या पथकाने दुकानाची तपासणी केली.

तपासणीदरम्यान भारतीय मानक संस्थेचे दर्जा चिन्ह नसलेले नऊ घरगुती प्रेशर कुकर आढळून आले. तसेच दोन प्रेशर कुकरवर बनावट दर्जा चिन्ह लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. या कुकरवर आवश्यक असलेला भारतीय मानक क्रमांक आणि परवाना क्रमांकही नमूद करण्यात आलेला नव्हता.

घरगुती प्रेशर कुकर गुणवत्ता नियंत्रण आदेश, २०२० तसेच भारतीय मानक ब्युरो अधिनियम, २०१६ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याने हे सर्व ११ प्रेशर कुकर जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी ही उत्पादने पुरावा म्हणून ताब्यात घेण्यात आली आहेत.

Advertisement

भारतीय मानक ब्युरोकडून संबंधित दुकानाविरोधात कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली असून ग्राहकांनी प्रेशर कुकरसह सक्तीचे प्रमाणन असलेली कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिचा परवाना आणि दर्जा चिन्हाची सत्यता भारतीय मानक ब्युरोच्या ‘बीआयएस केअर’ भ्रमणध्वनी अनुप्रयोगाद्वारे किंवा अधिकृत संकेतस्थळावर तपासून पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्राहकांच्या हिताचे संरक्षण आणि राष्ट्रीय प्रमाणन व्यवस्थेची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असे भारतीय मानक ब्युरोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.