Published On : Mon, Oct 11th, 2021

कोराडी वीज केंद्रात रोजगार स्थानिकांचा जन्मसिद्ध हक्क

Advertisement

– कोराडी वीज केंद्रातील राजकिय हस्तक्षेपामुळे स्थानिक उपाशी,भूमिपुत्रांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस लढा उभारणार

नागपुर – कोरोना महामारीच्या काळात मोठमोठया मल्टिनेशनल कंपनीत काम करणाऱ्या लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर हजारो लोक बेरोजगार झाले.काही नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे.अशात आता महानिर्मिती वीज केंद्रापैकी एक ६६० कोराडी वीज केंद्राच्या परिसरातील गरीब व गरजू लोकांसाठी दुर्दैवी बातमी आहे. राजकिय हातचे बाहुले बनविलेल्या कोराडी वीज प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांकडून गोपनीय पद्धतीने कंत्राटदारांच्या संगनमताने कंत्राटी कामगार भरती सुरू आहे.

निवडणूकांत स्थानिकांना रोजगार देऊ बोलणारे दुर्मीळ झाले असून त्यांना दुर्बिणीतून शोधावे लागेल. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी सांगितले. स्वीय साहायकांच्या मदतीने मंत्र्यांच्या बंगल्यावरून शिफारशी घेऊन येणारे लोंढे कोराडी वीज केंद्राच्या आत शिरून स्थानिकांच्या बोकांडीवर बसत आहेत. हा प्रकार सर्रासपणे मागील अनेक वर्षानुवर्षे पासून नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे महादूला नगर पंचायत मधील झोपड्यातील गरीब वस्त्यांमध्ये दारिद्र्य व व्यसनाधीन वातावरणात बदल होत नाही.ही वस्तुस्थिती आहे. याला जबाबदार फक्त राजकीय दबावाखाली कामे करवून घेणारे महानिर्मिती मुंबई कार्यालयातील बडे अधिकारी असून ही हुकूमशाही त्वरित बंद न केल्यास स्थानिकांचे वाटोळे होईल.कोराडी तील सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकजुटीने एकत्र येणे गरजेचे आहे. असे आवाहनही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी केले.

महानिर्मिती कोराडी वीज केंद्राला नियंत्रित करणाऱ्या प्रशासनामध्ये एक दोष आहे. तो दोष म्हणजे सामान्य जनतेच्या रोजगाराच्या सोयीचा अभाव. जे आर्थिकदृष्ट्या धनाढ्य असून स्वतः चे घर चालविण्यास समर्थ आहेत. त्या श्रीमंत लोकांस राजकिय पाठबळावर कंत्राटी कामगार म्हणून रोजगार देणे. स्थानिक गरीब व निराधार गरजू करीता महानिर्मिती ची काहीच व्यवस्था नाही.कोराडी वीज केंद्राच्या सुरक्षा भिंतीला असलेल्या संभाजी नगर,जयभीम नगर,सिद्धार्थ नगर व फुले नगर तसेच कोराडी वसाहतीला बाजार चौक झोपडपट्टी च्या सुरक्षा कवचामुळे सुरक्षा व्यवस्थेत करोडो रुपये वाचविण्यासाठी फायदा झाला आहे. अशा झोपडपट्टी वासीयांना रोजगार देण्यासाठी कोणीही धावपळ करत नाही. त्यांना तसेच दारिद्र्यात बेरोजगार म्हणून ठेवण्यात आले आहे.

खरोखरच या गरीब जनतेचा विचार मनात आला की दुःखाने काळीज फाटून जाते. हृदय दुःखाने विदीर्ण होते. स्थानिक नेते,बलाढ्य कंत्राटदार, व मंत्रालयातील काही स्वीय साह्ययक हे सर्व मिळून संभाजी नगर, जयभीम नगर, सिद्धार्थ नगर, फुले नगर व महादूला कोराडी भागातील झोपडपट्ट्यांना अवनतीस नेत आहेत.कोराडी वीज केंद्रातील मुख्य अभियंता व अधिकारी राज्यकर्त्यांच्या हातचे बाहुले बनविल्या जात असून त्यांना त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याने स्थानिक रोजगारपासून दूर आहेत. कोराडी वीज केंद्राने रोजगारात स्थानिकांना प्राधान्य दिले नाही तर झोपडपट्टी वासीयांची वर्षानुवर्षे पासून होत असलेली फसवणूक थांबणार नाही. कोराडी विज केंद्राचे आर्थिक धागे काही ठराविक मोजक्या राजकीय लोकांच्या फायद्यासाठी आणि सोयीसाठी, सामाजिक आणि आर्थिक विचारांच्या धाग्यात विणले गेले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत व महानिर्मिती ने स्थानिकांकडे विशेष लक्षकेंद्रित करून एका महत्वाच्या आणि जबाबदारी च्या कर्तव्याकडे पुढाकार घ्यावा.

कोराडी वीज केंद्र मुख्य अभियंता कार्यालयाच्या स्थितीत दुरुस्ती करावी. राजकीय हस्तक्षेपातून दबावाखाली कोराडी वीज प्रशासन असल्याने ८०% स्थानिकांना रोजगार देण्याविषयी अतिशय उदासीन आहे. असे प्रखर मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी मांडले.
सरकार कोणतेही असो, मागील ५० वर्षांपासून दारिद्र्यात खितपत पडलेल्या झोपडपट्टी वासीयांच्या दृष्टीने कोराडी वीज केंद्रात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देणे ही आज काळाची गरज बनली आहे. महानिर्मिती व्यवस्थापन मुंबई वेळ काढू पणाची भूमिका घेत आहे. स्थानिकांच्या संमतीविना कोणतीही कंत्राटी कामगार भरती राबवली जाऊ शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,ऊर्जा मंत्री नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व जल संपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निवेदनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी आपली कैफियत मांडली.

कोराडी वीज केंद्रात रोजगार स्थानिकांचा जन्मसिध्द हक्क असूनही स्थानिकांना निवडणूकित फक्त रोजगाराचे आश्वासन मिळते.परंतु नेहमी नशिबी उपेक्षाच येते.राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिकांना एकजूट करून लढा उभारणार !

– भुषण चंद्रशेखर
जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर(ग्रा)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत ८० टक्के प्राधान्य असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. स्थानिकांना रोजगारासाठी वणवण फिरावे लागते. हे स्थानिक नेते व राजकारण्यांचे अपयश आहे.
– सचिन नरवाडे
कोराडी मीडिया प्रमुख युवासेना

महानिर्मिती कोराडी वीज केंद्रात धनाढ्य पुरुषांचे वर्चस्व असून स्त्रियांचे स्थान नगण्य झाले. स्वार्थी राजकारणाने झोपडपट्टीतील स्त्रीया केवळ स्थानिक नेते व श्रीमंतांच्या घरातील धुणीभांडी, स्वयंपाक करण्यापुरत्या मर्यादित राहिल्या. ही वस्तुस्थिती आहे.
– उषा रघुनाथ शाहू
अध्यक्ष कामठी विधानसभा
राष्ट्रवादी महिला काँग्रेस

प्रत्येक मंत्री आपल्या मतदारसंघापुरतं पाहतोय असं दिसतंय. कोराडी वीज केंद्राच्या मुख्य अभियंतांना दबावात ठेवून भूमिपुत्रांना डावलून मतदारसंघातील मतदारांची भरती करतो. ही परंपरा बंद झाली पाहिजे.
– किरण बलखंडे
बी.कॉम पदवीधर

महादूला येथील गरिबांच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणे कोराडी वीज प्रशासनाकडे मांडावेत. झोपडपट्टीतील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोराडी वीज केंद्राची भूमिका महत्वपूर्ण आहे.
– मनोज विरघट
आय.टी.आय.(डिझेल मेकॅनिक)

महानिर्मिती २१० व ६६० कोराडी वीज केंद्रात राजकीय दडपशाही होत असून स्थानिकांचा रोजगार उध्वस्त करण्याचा डाव सुरू आहे. येथे लोकशाही नसून राजकीय हुकूमशाही आहे.सरकारने बघ्याची भूमिका घेणे योग्य नाही. स्थानिकांना न्याय द्या!
– रोशन इंदूरकर
डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल
संभाजी नगर, महादूला