प्रकल्पग्रस्तांना मानले पालकमंत्र्यांचे आभार
नागपूर: कोळसा खाणीसाठी कामठी तालुक्यातील बीना व सावनेर तालुक्यातील भानेगाव या दोन्ही गावांचे पुनवर्सन वेस्टर्न कोलफिल्ड्स करणार असून या गावातील जमिनी भूसंपादन करून वेकोलिने ताब्यात घेतल्या आहे.
वेकोलिनेच हे पुनर्वसन करावे असे पत्रपरिपत्रक शासनाने जारी केले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असून पालकमंत्र्यांनी बीना व भानेगावच्या जनतेला दिलेला शब्द प्रत्यक्षात आणून दाखवला. या गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून त्यांचे आभार मानले. पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व नागरिकांनी शासकीय परिपत्रकाची प्रती दिल्या.
या गावांचे भूसंपादन कोळसा खाणींसाठी झाले आहे. बीना हे गाव ब्लास्टिंग झोनच्या 500 मीटरच्या आत आहे. त्यामुळे गावातील घरांना धोका होऊ शकतो. गावालगत खदान असल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची पातळी कमी होईल. खदानीमुळे या भागातील हवा प्रदूषित राहील. अशा अनेक कारणांसाठी या दोन्ही गावांचे पुनर्वसन आवश्यक आहे.
जर वेकोलिने बीना गावाचे संपूर्ण पुनर्वसन त्यांची जबाबदारी असल्यामुळे एजन्सी म्हणून केले तर पुनर्वसनासाठी लागणारा निधी हा जास्त असल्यामुळे हा प्रकल्प तोट्यात जाईल असे वेकोलिने जाहीर केले. या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. बीना व भानेगाव या गावाच्या पुनर्वसनाबाबतचा एकूण खर्च 206.73 कोटी असून यापैक 84.76 कोटी इतक्या खर्चाचे दायित्व वेकोलिकडे येईल.
या गावांचे पुनर्वसन केल्यानंतर त्या गावाखालून उपलब्ध होणारा अतिरिक्त 6 दशलक्ष टन इतका कोळसा महानिर्मिती कंपनीस देण्याची जबाबदारी वेकोलिची राहणार आहे. या संदर्भात पुनर्वसनच्या अडचणी निर्माण झाल्यास वेकोलिने जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. वेकोलि, महानिर्मिती व शासन यांनी मूल्य विभागणी तत्त्वावर पुढील कारवाई करावी असेही शासकीय परिपत्रकात म्हटले आहे.
