भंडारा – तुमसर तालुक्यात सप्टेंबर 2024 मध्ये आलेल्या पूरानंतर नुकसान भरपाईच्या यादीत मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून, महसूल विभागातील बिनाखी साजा क्र. ११ चे महसूल सेवक महेश बिसने यांना निलंबित करण्यात आले आहे. वैनगंगा नदीला पूर आल्याने सुकली नकुल आणि गोंडीटोला या गावांतील शेतात पाणी घुसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार केली होती.
मात्र, या यादीत अनेक अपात्र व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आली होती. विशेष म्हणजे, महसूल सेवक महेश बिसने यांच्या पत्नीचेही नाव लाभार्थी यादीत आढळून आले, जरी त्यांच्या नावावर कोणतीही शेती नव्हती. चौकशीत हे नाव मुद्दामहून घालण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या गंभीर अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर बिसने यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, दोन सदस्यीय चौकशी समितीने संबंधित तलाठी व पोलीस पाटील यांच्याविरोधातही कारवाईची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली आहे.
या प्रकारामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, ग्रामीण भागातील शेतकरी व संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पुढील तपास सुरू असून, आणखी अनियमितता उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.