नागपूर :बेहिशेबी मालमत्ता साठविल्याच्या प्रकरणात सीबीआयतर्फे मॉईलच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सचिन गजल्लेवार असे संबंधित माजी मुख्य व्यवस्थापकाचे नाव आहे. सीबीआयकडून गजल्लेवार यांच्या विरोधात गुन्हेगारी षडयंत्र, फसवणूक, गुन्हेगारी गैरवर्तणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गजल्लेवार याने स्वत:च्याच बायकोच्या फर्मला नियमबाह्य पद्धतीने मॉईलच्या कामांचे कंत्राट दिले असल्याची तक्रार करण्यात आली होती.
मॉईलने यासंदर्भात अंतर्गत चौकशी केली होती. या अंतर्गत चौकशीतून गजल्लेवारने गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले. यानंतर मॉईलचे मुख्य व्हिजिलन्स अधिकारी प्रदीप कामले यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपमहानिरीक्षक एम.एस.खान यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे सीबीआयने चौकशी केली आहे.
सीबीआयने गजल्लेवारसह पत्नीच्या बॅंक खात्यांची पडताळणी केली असता त्यातून मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार झाल्याचे समोर आले.
गजल्लेवारने मॉईलची १.३५ कोटींनी फसवणूक केली तसेच बेहिशेबी मालमत्ता जमा केली. यासंदर्भात चौकशीनंतर सीबीआयने गजल्लेवारविरोधात गुन्हेगारी कट, मालमत्तेचा गैरवापर, फसवणूक, खोटेपणा बनावट दस्तऐवजांचा वापर आणि गुन्हेगारी गैरवर्तन इत्यादी कलमे लावण्यात आली आहे.