
नागपूर : शहरात अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत पारडी नाका परिसरातून तब्बल 65 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ओडिशा ते हैदराबाद अशी तस्करी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या पारडी ट्रॅफिक झोन टीमकडून ‘ऑपरेशन यू-टर्न’ अंतर्गत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. याच दरम्यान हैदराबाद बायपास रोडवरील शर्मा ढाब्याजवळ आंध्र प्रदेश पासिंग असलेली एक टॅक्सी कार तपासणीसाठी थांबवण्यात आली.
ड्रायव्हरची अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी त्याचे संशयास्पद वर्तन आणि कारमधून येणारी तीव्र दुर्गंधी यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली असता डिक्कीत टिनच्या पत्र्याखाली लपवलेला सुमारे 65 किलो गांजा आढळून आला.
या प्रकरणात वाय. चिरंजीव मेघेश्वर राव (श्रीकाकुलम, आंध्रप्रदेश) आणि के. भीमा राजू लक्ष्मण राव (विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांनी ओडिशाहून हैदराबादपर्यंत गांजा पोहोचवण्याचे काम मिळाल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या तस्करीमागील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असून आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








