नागपूर: नागपूर शहराच्या राजकारणात गुरुवारी मोठी उलथापालथ झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नागपूर ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघाचे प्रभावी उपजिल्हाप्रमुख मुकेश रेवतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भव्य प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे नागपूर ‘दक्षिण’ भागातील शिवसेनेच्या संघटनेला मोठा धक्का बसला असून, त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील राष्ट्रवादीत सामील झाले.
भंडारा जिल्हा कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात नागपूर शहरातील महत्त्वपूर्ण नेते उपस्थित होते. पक्षाचे निरीक्षक राजेंद्रजी जैन, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नानाभाऊ टाकसाळे, माजीमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, महासचिव धनंजय दलाल, तसेच चंद्रकांत नायक, लक्ष्मण बालपंडे, ईश्वर कोल्हे यांसारखे नेते उपस्थित होते.
मुकेश रेवतकर हे नागपूर ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघात परिचित, ऊर्जावान आणि जमीन पातळीवर मजबूत पकड असलेले नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेमध्ये त्यांनी अनेक वर्षे संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे नागपूर ‘दक्षिण’ मधील शिवसेनेच्या संघटनात्मक जाळ्याला मोठा धक्का बसला आहे.
पक्ष निरीक्षक राजेंद्रजी जैन म्हणाले,मुकेश रेवतकर यांसारखा नेता आमच्या पक्षात आल्याने, नागपूर ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक बळकट झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात मदत होईल आणि आगामी काळात या मतदारसंघात आमचा प्रभाव निश्चितच वाढेल.या प्रवेशामुळे नागपूर ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे आणि शिवसेनेच्या मूळ गटाला संघटनात्मक आव्हान निर्माण झाले आहे.