नागपूर :शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाढता भौगोलिक विस्तार लक्षात घेता, गृहमंत्रालयाने नागपूर शहरात नव्या पोलिस ठाण्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. काही विद्यमान ठाण्यांचे कार्यक्षेत्र विभागून नवी ठाणे उभारली जाणार आहेत, तसेच ग्रामीण भागातील काही क्षेत्रेही शहर पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत आणली जाणार आहेत.
परिमंडळ ६ ची स्थापना, पखाले यांच्या हाती जबाबदारी-
सर्वात मोठा बदल परिमंडळ ५ मध्ये करण्यात आला आहे. खापरखेड़ा पोलिस ठाणे शहर मर्यादेत आल्यामुळे नवीन परिमंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या नव्या परिमंडळ ६ ची जबाबदारी डीसीपी संदीप पखाले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
कामठी रोडवरील कडमी चौकापासून खापरखेड़ा आणि कामठीपर्यंतचा परिसर परिमंडळ ६ मध्ये येईल. याआधी परिमंडळ ५ अंतर्गत असलेली जरीपटका, कपिलनगर, कोराडी, न्यू कामठी आणि ओल्ड कामठी ही ठाणे आता परिमंडळ ६ अंतर्गत येतील. याशिवाय खापरखेड़ा आणि नव्याने स्थापन होणारे भिलगाव पोलिस ठाणे यांचा समावेश होणार असून, परिमंडळ ६ अंतर्गत एकूण सात ठाणे असतील.
या परिमंडळात एसडीपीओ कामठी आणि एसडीपीओ जरीपटका असे दोन विभाग कार्यरत राहतील. दुसरीकडे, परिमंडळ ५ मध्येही सात पोलिस ठाणे राहतील — यशोधरानगर, कलमना, पारडी, बाठोड़ा आणि नव्याने स्थापन होणारी ठाणे यांचा त्यात समावेश असेल.
नवीन ठाण्यांची उभारणी सुरू-
परिमंडळ ५ मध्ये तीन नवीन पोलिस ठाण्यांची उभारणी सुरू आहे — कलमना गाव, गरोबा मैदान आणि भांडेवाडी.
कलमना गाव आणि गरोबा मैदानसाठी प्रस्तावित जागेचे निरीक्षण सुरू आहे, तर भांडेवाडी पोलिस ठाण्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून लवकरच उद्घाटन होणार आहे.
याशिवाय परिमंडळ ४ मध्ये पिपळा गाव, आणि परिमंडळ १ मध्ये कानोलीबारा येथे नवे पोलिस ठाणे उभारले जाणार आहे.
गुन्हेगारीच्या दृष्टीने परिमंडळ ५ व ६ अतिसंवेदनशील-
गुन्हेगारीच्या दृष्टीने परिमंडळ ५ आणि ६ हे शहरातील सर्वाधिक संवेदनशील विभाग मानले जातात. गेल्या काही वर्षांत येथे गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक राहिले आहे.
न्यू आणि ओल्ड कामठी, कलमना, पारडी, खापरखेड़ा आणि कोराडी या भागांमध्ये बाहेरील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग येतो आणि स्थायिक होतो. त्यामुळे येथील घनदाट लोकवस्ती लक्षात घेता, या परिमंडळांमध्ये अधिक पोलिस मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
मनुष्यबळाचा तुटवडा कायम-
शहरात नवी ठाणे उभारली जात असली तरी मनुष्यबळाच्या कमतरतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ठाण्यांमध्ये १९६० च्या दशकानंतर कर्मचारीसंख्या वाढवण्यात आलेली नाही.
अनेक अधिकारी व कर्मचारी अल्प मनुष्यबळात कार्यरत आहेत. नवीन ठाण्यांचे बांधकाम सुरू असले तरी जुन्या ठाण्यांतूनच मनुष्यबळ हलवले जात आहे.
गुन्हे रोखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाने जसे पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत, तसेच पुरेसे मनुष्यबळ नेमणे अत्यावश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. सध्या शहरातील बहुतांश पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात १ लाखांहून अधिक लोकसंख्या आहे, पण शंभरहून अधिक कर्मचारी असलेली ठाणे फारच कमी आहेत.