नागपूर : शहरात वाहतूक पोलिसांनी खासगी ट्रॅव्हल्स बसांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यावर अवैधरित्या उभ्या राहणाऱ्या किंवा प्रवाशांना चढविणे–उतरणे करणाऱ्या बसांवर आता थेट कारवाई सुरू झाली आहे. यासाठी वाहतूक विभागाने सात विशेष पथके तैनात केली आहेत.
सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत कारवाई-
वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत या कारवाया सुरू राहतील. या वेळेत शहरात कुठेही नियमबाह्य पद्धतीने थांबलेल्या बसांना थेट दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नवीन वाहतूक नियमांनुसार इनर रिंग रोडच्या आत खासगी बसांना पार्किंग, पिक-अप किंवा ड्रॉप करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बस केवळ ठरवून दिलेल्या पार्किंग स्थळांवर किंवा इनर रिंग रोडच्या बाहेरूनच प्रवाशांना घेऊ शकतील.
वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण-
नागपूर शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाख असून, त्यापैकी २० लाख दुचाकी आणि ५ लाख चारचाकी वाहने नोंदणीकृत आहेत. अशा परिस्थितीत खासगी बस रस्त्यावर अवैधरित्या उभी राहिल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत होता. या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक विभागाने ही विशेष मोहीम राबवली आहे.
१२ सप्टेंबरपर्यंत मोहीम सुरू-
ही कारवाई १२ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी सेंट्रल अव्हेन्यू, जाधव चौक, कॉटन मार्केट, गीतांजली चौक, रहाटे कॉलनी चौक, रवी नगर चौक, दिघोरी चौक, छत्रपती चौक यांसारख्या प्रमुख रस्त्यांवर आणि हायवे मार्गांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे.