महापौर दयाशंकर तिवारी यांची संकल्पना : कारगील वॉर हिरो परमवीरचक्र विजेते योगेंद्र यांची उपस्थिती
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने मध्य नागपुरातील प्रभाग क्र.१९ बजेरिया या परिसरातील एम्प्रेस मॉल समोर महाराष्ट्र टेक्सटाईल्स कार्पोरेशनद्वारे महानगरपालिकेला प्रदत्त भुमीवर १.२० लाख वर्ग. फुट जागेत एम्प्रेस मॉलसमोर भारतीय सेनेमध्ये ज्या सैन्यांना परमवीर चक्र या पदाने सन्मानीत करण्यात आले त्या सर्वांच्या स्मृतीत “वंदे मातरम” उद्यान निर्माण करण्यात येत आहे.
शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कारगिल वॉर हीरो परमवीरचक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते एम्प्रेस सिटी मॉलच्या समोर साकारण्यात येणा-या ‘वंदे मातरम्’ उद्यानाच्या कार्याचे भूमिपूजन होईल. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जा तथा जिल्हयाचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहतील, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार उपस्थित होते.
एम्प्रेस मॉल समोरील १.२० लाख वर्ग फुट जागेत साकार होणा-या ‘वंदे मातरम् उद्याना’ची विशेषत:, येथील व्यवस्था, येथे उभारण्यात येणारे शहिदांचे सिरॅमिकचे म्युरल आदी सर्व बाबींची माहिती देणारी संकल्पचित्रफीत तयार करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत चित्रफितचे प्रसारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओला स्वतः महापौर दयाशंकर तिवारी यांनी आवाज दिला आहे.
वंदे मातरम उद्यानाच्या भुमिपूजन समारंभाचे महापौर दयाशंकर तिवारी अध्यक्षस्थान भूषवितील. याप्रसंगी विशेषत्वाने खासदार डॉ.विकास महात्मे आमदार सर्वश्री नागो गाणार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, ब्रिगेडियर प्रमोदकुमार मिश्रा, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, बसपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, रा.काँ. पक्षनेता दुनेश्वर पेठे, शिवसेने गटनेता किशोर कुमेरिया, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक ॲड. संजयकुमार बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक यांची उपस्थिती असेल.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना महापौर म्हणाले, ‘वंदे मातरम्’ उद्यान या परिसरात २१ परमवीर चक्र विजेत्यांची ग्लास फायबरचे म्युरल राहणार आहे. सोबतच प्रत्येकांची जीवनी तेथे लावण्यात येणार आहे. या शिवाय ज्या युध्दामध्ये त्यांनी आपले शौर्य प्रदर्शित केले त्या युध्दभुमीचे चित्रांकन सुध्दा सिरॅमिकचे म्युरल प्रतिमेच्या पार्श्वमध्ये करण्यात येणार आहे. प्रतिमेच्या आजूबाजूला लॅन्डस्केप करून प्रत्येक प्रतिमेला सुशोभित करण्यात येणार आहे. याशिवाय त्या परिसरात युध्दात वापरण्यात आलेले एक टँक, एक मिग विमान, एक तोफ हे सर्व वॉर ट्राफी म्हणून ठेवले जाणार आहे. या शिवाय देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये नागपूर शहरात आणि नागपूर जिल्हयात ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान दिलेले आहे. त्यांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी एक एम्पी थियेटर निर्माण केले जाणार आहे. या एम्पी थियेटरच्या पार्श्व भिंतीवर सर्व हुतात्म्याचे नाव लिहिले जाणार आहे. २५० आसन चे एम्पिथियेटर साकारले जाणार आहे. प्रत्येक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमात हे सर्व हुतात्मे साक्षी राहतील ही त्यामागची संकल्पना आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी दोन खाजगी सेना निर्माण झाल्या होत्या, एक आझाद हिंद सेना आणि दुसरी हिंदुस्थानी लाल सेना. आझाद हिंद सेनेचे निर्माण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी परदेशात केले आणि हिंदुस्थान लाल सेनेचे निर्माण नागपूर शहरातील तेलंगखेडी तलाव ज्याला त्या काळात राणी तलाव म्हणून ओळखले जात होते. तेथे १३ ऑगस्ट १९३९ या वर्षी करण्यात आले. उद्यानात हिंदुस्थानी लाल सेनेचा दिखावा सुध्दा उभारला जाणार आहे. सेनेला समर्पित हे उद्यान असल्यामुळे येथे बांबुचा पुल साकारला जाणार आहे. तो तेथे अस्तित्वात असलेल्या झाडांवरच असणार आहे.
याशिवाय ७९६० चौ.मी. जागेत लहान मुलांना खेळण्यासाठी जागा तयार केली जाणार आहे. तेथे लहान मुलांना दुखापत होणार नाही या दृष्टीने इपीडीएम फ्लोरिंग लावली जाणार आणि आधुनिक खेळणी लावली जाणार आहे. जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या वयोमानाप्रमाणे व्यायामाचे यंत्र सुध्दा उभारले जाणार आहे. परिसरातील नागरिकांसाठी जवळपास ७०० रनिंग मीटर लांबीचा वॉकिंग ट्रॅक उभारला जाणार आहे आणि ग्रीन जीमची व्यवस्था केली जाणार आहे. उद्यानाचा प्रवेशद्वार हा इंडिआ गेटच्या स्वरूपात साकारला जाणार आहे. त्याला लागूनच अमर जवान स्मारक सुध्दा साकारले जाणार आहे. अॅडव्हेंचर स्पोर्टच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व्हावे या दृष्टीने सुध्दा पुढील कारकीर्दीत व्यवस्था करण्याचा मानस आहे.
संपूर्ण देशभरात भारतीय सेनेला समर्पित फक्त एकच जागा आहे, दिल्लीमध्ये मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींनी साकार केलेली वार मेमोरियल त्यानंतर भारतीय सेनेला समर्पित स्वायत्त संस्थेद्वारे तयार करण्यात येणारे हे देशातील एकमात्र उद्यान असणार आहे. या उद्यानाच्या माध्यमातून लोकांमध्ये भारतीय सैन्याबद्दल आकर्षण निर्माण व्हावे आणि भारतीय सेनेत नागपूर शहरातील आणि विदर्भीय जनतेत सैन्य भरतीबद्दल आकर्षण निर्माण होवून वातावरण निर्मीती करण्यासोबतच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय सैन्याला वैदर्भीय जनतेचे अभिवादन म्हणून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर कडून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन प्रसंगी कारगील युध्दामध्ये ज्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आलेले आहे. अशा बुलंदशहराचे कॅप्टन श्री. योगेंद्र यादव भुमीपुजनासाठी येणार आहेत.
कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून कार्यक्रमात उपस्थित राहताना मास्क परिधान करावे व शारीरिक अंतर राखले जाईल. याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपायुक्त रवींद्र भेलावे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांनी केले आहे.