Published On : Sun, Sep 30th, 2018

भरतनगर चौक झाला आता ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार चौक

Advertisement

नागपूर: ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या ज्ञानाची आणि कार्याची महती मोठी आहे. राजकारण्यांसाठी ते प्रेरणा होते. समाजकारण्यांसाठी ते आदर्श होते आणि बुद्धीवंतांसाठी ते ज्ञानाचा झरा होते. हा ज्ञानाचा खळखळता झरा कमी वयात थांबला असला तरी त्यांची कीर्ति आजही सर्वविदित आहे. अमरावती मार्गावरील भरत नगर चौकाचे नामकरण त्यांच्या नावाने करणे हा नागपूर शहरासाठी भाग्याचा क्षण आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

भरत नगर चौकाला ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांचे नाव देण्यात आले. यानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, श्रीमती राजश्री जिचकार, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, कर व कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सुनील हिरणवार, नगरसेवक निशांत गांधी, किशोर जिचकार, नगरसेविका शिल्पा धोटे, याज्ञवल्क जिचकार, जयप्रकाश गुप्ता उपस्थित होते.

Gold Rate
06 May 2025
Gold 24 KT 97,000/-
Gold 22 KT 90,200/-
Silver/Kg 96,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौर नंदा जिचकार पुढे बोलताना म्हणाल्या, डॉ. श्रीकांत जिचकार यांचे जीवन इतरांसाठी मार्गदर्शक बनले. त्यांची ख्याती केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात होती. प्रत्येक विषयातील, प्रत्येक क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अफाट होते. त्यांच्या आठवणी, स्मृती कायम राहण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने भरतनगर चौकाचे नामकरण ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार असे करून त्यांच्या कार्याचा वसा चिरकाल स्मरणात राहण्यासाठी अल्पसा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कार्याची अमूल्य ठेव आम्ही जोपासल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.

आ. सुधाकर देशमुख यांनी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या ज्ञानाच्या आणि कार्याच्या गोष्टींना उजाळा देत अनेक प्रेरणादायी अनुभव सांगितले. साधी राहणी, उच्च विचार असलेले डॉ. श्रीकांत जिचकार यांनी राजकारणात ज्ञानाचा आणि संसदीय आयुधांचा वापर करून आपल्या कार्याचा त्यांनी ठसा उमटविला. आजच्या अनेक काँग्रेस नेत्यांना त्यांनी घडविले आहे. त्यांच्या मागे मोठा जनसमूह होता. डॉ. श्रीकांत जिचकार खऱ्या अर्थाने हिंदुत्व जगले. कुशल संघटक, कुशल राजकारणी आणि कुशल समाजकारण या शब्दात आ. सुधाकर देशमुख यांनी त्यांचा गौरव केला. चौकाचे नामकरण झाले, मात्र आता परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासी पत्त्यावर नवे नाव टाकले तर खऱ्या अर्थाने डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे ठरेल.

तत्पूर्वी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार चौक नामफलकाचे अनावरण महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले. प्रास्ताविक नगरसेवक किशोर जिचकार यांनी केले. संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. आभार नगरसेवक निशांत गांधी यांनी मानले. कार्यक्रमाला देवराव डेहनकर, बाबा वकील, नरेंद्र इंगळे, राजुभाऊ बुरडकर, शेखर जिचकार, संध्या इंग़ळे, सुशील फत्तेपुरिया, विद्युत मिश्रा, भास्कर अंबादे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

Advertisement
Advertisement