Published On : Fri, May 21st, 2021

भांडेवाडीतील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करा : महेश महाजन

Advertisement

आरोग्य सभापतींची भांडेवाडी डम्पिंग यार्डला भेट

नागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये येणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होत नसल्यामुळे कचरा तेथेच साचून राहतो. या कचऱ्याची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेद्वारे प्रस्तावित असलेला कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प तसेच सुका कचऱ्याकरिता एमआरएफ प्रकल्पावर तात्काळ प्रशासकीय प्रक्रिया करून अंमलात आणण्याचे निर्देश मनपाच्या आरोग्य समितीचे सभापती महेश महाजन यांनी दिले.

भांडेवाडी येथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना भेट देऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. भांडेवाडी येथे साचून असलेल्या कचऱ्यावर सुरू असलेल्या बायोमायनिंग प्रकल्पालाही त्यांनी यावेळी भेट दिली. या प्रकल्पामुळे तेथील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमीन समतोल करण्यात येत असल्यामुळे कामाबाबत समाधान व्यक्त केले.

या प्रकल्पाला गती देऊन ठराविक कालावधीत काम पूर्ण करण्याच्या सूचनाही श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या. प्रकल्पातून निर्माण होणारे खत महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये उपयोगात आणण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. भांडेवाडी येथील पशुनिवारा केंद्रालाही त्यांनी भेट दिली. तेथील कार्यपद्धतीची सखोल माहिती घेतली. या दौऱ्यात त्यांच्यासोबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, विभागीय अधिकारी रोहिदास राठोड, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, राजेश हाथीबेड उपस्थित होते.