
भंडारा : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा, भंडारा जिल्हा महिला मोर्चाद्वारे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या निवासस्थानी पाचव्या रक्षाबंधन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला भंडारा जिल्ह्यासह परिसरातील तब्बल ४,००० ते ५,००० महिला भगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. महिला भगिनींनी आमदार डॉ. परिणय फुके यांच्या मनगटावर राखी बांधून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा स्नेहबंध अधिक दृढ केला.
हजारो महिला भगिनी एकाच ठिकाणी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे करत असल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक भगिनीने प्रेमाने राखी बांधून डॉ. परिणय फुके यांना शुभेच्छा दिल्या. महिलांनी व्यक्त केलेल्या या प्रेमाने आणि आपुलकीने डॉ. परिणय फुके भावूक झाले. रक्षाबंधनाच्या माध्यमातून केवळ भाऊ-बहिणीचे पारंपरिक नाते जपणे एवढाच या कार्यक्रमाचा उद्देश नसून महिलांचा सन्मान, सुरक्षितता, स्वाभिमान आणि सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
महिला मोर्चाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून यंदाच्या पाचव्या वर्षी महिला भगिनींचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद विशेष ठरला. यावेळी महिलांशी संवाद साधताना डॉ. परिणय फुके यांनी महिलांच्या प्रश्नांना सदैव प्राधान्य देण्याचा, त्यांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर राहण्याचा तसेच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी व्हाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून महिलांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. लखपती दीदी, बचत गट, स्वयंरोजगार, महिला उद्योजकता, कौशल्य विकास आणि आर्थिक स्वावलंबनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांनी आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पुढे जावे, असेही सांगण्यात आले. “महिला सशक्त झाली तर कुटुंब सशक्त होते आणि कुटुंब सशक्त झाले तर समाज व राष्ट्र सशक्त होते,” या विचारातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाला महिला जिल्हा अध्यक्ष महेश्वरी नेवारे, नगराध्यक्ष मधुराताई मदनकर, जिल्हा महामंत्री कल्याणी निखाडे, नगराध्यक्ष विजयाताई नांदुरकर,
नगराध्यक्ष देवश्रीताई कापगते, नगराध्यक्ष बसेशंकरताई, नगरसेवक भावना वैद्य, प्रीती ब्राह्मणकर, श्रद्धा डोंगरे, धनवंता राऊत, प्रीती गाढवे, प्रीती मालेवार, पूजा पाटील, कल्याणी मते, पेजल भुरे, कोकीला बलबुधे, वनिता डोये, कल्पना कुर्जेकर, सुरमीला पटले, दिशा निमकर, सपना बुरडे, रोशनी पडोळे, चंद्रकला भोपे, वैशाली ब्राह्मणकर, भाग्यश्री कळंबे, जया हिंगणे, मीना लांजेवर, आशा उईके आणि यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि जिल्ह्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
४,००० ते ५,००० महिला भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भंडारा येथील पाचवा रक्षाबंधन सोहळा हा महिला एकजुटीचा, स्नेहबंधाचा, महिला सन्मानाचा आणि सक्षमीकरणाचा भव्य उत्सव ठरला. महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित महिला भगिनींनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत हा प्रेमाचा आणि विश्वासाचा स्नेहबंध दरवर्षी असाच कायम राहावा, अशी भावना व्यक्त केली.






