Published On : Mon, Aug 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

धर्मांतर झाले म्हणून ओबीसी आरक्षण जाणार नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

Advertisement

धर्मांतर झाले म्हणून ओबीसी आरक्षण जाणार नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारल्याने एखाद्या व्यक्तीची मूळ ‘आगरी ओबीसी’ जात आपोआप संपुष्टात येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे उरण नगरपरिषदेच्या काँग्रेस नगरसेविका नंदा नामदेव म्हात्रे ऊर्फ नाहिदा इरफान ठाकूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उरण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नंदा म्हात्रे यांनी ‘ओबीसी आगरी’ प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. मात्र, मुस्लिम व्यक्तीशी विवाह करून इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या कारणावरून रायगड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते.

या निर्णयाला नंदा म्हात्रे यांनी ॲड. चिंतामणी भनगोजी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. रियाझ छागला आणि न्या. फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे ओबीसी प्रवर्गातील सवलती आपोआप रद्द होत नाहीत, अशी तरतूद राज्य सरकारच्या २९ जानेवारी १९८३ आणि ३ जून १९९६ रोजीच्या शासन निर्णयांमध्ये असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.

Advertisement

उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत रायगड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा १० ऑगस्ट २०२६ रोजीचा निर्णय रद्द केला. तसेच संबंधित शासन निर्णयांचा विचार करून समितीने २३ नोव्हेंबरपर्यंत फेरसुनावणी घ्यावी आणि नव्याने निर्णय द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले.

या निर्णयामुळे धर्मांतर किंवा आंतरधर्मीय विवाह झाल्यानंतर ओबीसी जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.