Published On : Sat, Jun 30th, 2018

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाला नवं वळण ; दहा पानी निनावी पत्राने खळबळ

इंदूर: स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंदूर पोलिसांना एक दहा पानी निनावी पत्र मिळाले असून त्यात दुसऱ्या पत्नीच्या वर्तनामुळे भय्यू महाराज तणावत होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं म्हटलं आहे. पत्र पाठवणाऱ्याने आपण भय्यू महाराजांचे सेवक असल्याचा दावा केला असून पोलिसांनी या पत्राच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.

भय्यू महाराज यांनी १२ जून रोजी त्यांच्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. यावेळी त्यांनी लिहिलेली कथित सुसाईड नोट मिळाली होती. त्यात तणावातून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

इंदूरचे पोलीस उपमहानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्र यांनी निनावी पत्र आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या दहा पानी पत्रातील माहितीची सत्यता पडताळण्यात येत असल्याचेही मिश्र यांनी सांगितलं.

भय्यू महाराजांची दुसरी पत्नी आयुषी त्यांच्यासोबत सतत भांडायची. त्यामुळे ते तणावात होते, अशा प्रकारचा आरोप या पत्रात करण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आयुषी यांची आई राणी शर्मा यांनी हे आरोप फेटाळून लावले असून पत्रातील आरोपात काहीच तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.