Published On : Sat, Mar 7th, 2020

होळी पेटवतांना खबरदारी घ्या महावितरणचे वीज ग्राहकांना आवाहन

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजे होळी, आपल्याकडे धुळवड आणि रंगपंचमी अश्या दोन्ही दिवशी रंगोत्सव साजरा केल्या जातो. लाल, पिवळा,निळा,केशरी,पिवळा अश्या रंगाची उधळण करीत हा उत्सव आपण साजरा करतो. रंगाची उधळण करीत असताना थोडी खबरदारी घेतली तर होळीच्या काळात होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवता येते. होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताचे गालबोट लागू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

होळी पेटवताना सभोवताल वीज वाहिन्या किंवा वितरण रोहित्र तर नाहीत ना याची खात्री करून घ्या. अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीज वाहिन्या वितळून त्या जमिनीवर खाली पडून भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नागपूर सारख्या मोठ्या शहरात अनेक ठिकाणी महावितरणकडून भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. होळी पेटवतांना भूमिगत वीज वाहिन्यांपासून दूर अंतरावर ती पेटवावी. होळी पेटवताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करावा. होळी ट्रकमधून आणताना लाकडांचा वीज वाहिन्यांना स्पर्श होणार नाही याची सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे. आपली एक लहान चूकही प्राणावर बेतू शकते याकडे महावितरणने लक्ष वेधले आहे.

होळीच्या काळात हुल्लडबाजीचा फटका वीज वहिन्यानं बसतो. अनेकदा मद्यधुंद वाहन चालक वीज खांबांना धडक देतात. यात वीज यंत्रणेचे नुकसान होतेच पण प्रसंगी अपघात होऊन जीव आणि वित्त हानी झाली आहे. उत्सवप्रिय जनतेच्या आनंदावर विरजण पडू नये यासाठी महावितरणकडून कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.

अनेकदा रंगोत्सव साजरा करतेवेळी उत्साहाच्या भरात फुग्यांचा वापर केल्या जातो. अनेकदा फुगे वीज वाहिन्यांना स्पर्श करतात. प्रसंगी परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित होतो. फुग्यांचा वापर टाळल्यास असा प्रसंग येणार नाही. विजेची उपकरणे आहेत अश्या जागेपासून लांब अंतरावर रंगोत्सव खेळल्यास आनंदात भर पडेल.

वीज खांबाच्या सभोवताल पाणी जमा होणार याची काळजी घ्या. वीज मीटर. पिन, सॉकेट अशा उपकरणांना पाण्याचा स्पर्श होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. ओल्या हाताने विजेच्या उपकरणांना स्पर्श करू नका. वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा. असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तातडीच्या वेळी वीज ग्राहकांनी १९१२, १८००२३३३४३५ किंवा १८००१०२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.