Published On : Mon, Sep 17th, 2018

मराठवाड्याला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री

औरंगाबाद: मागील चार वर्षात सिंचनाचा अनुशेष, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, बळीराजा शेतकरी संजीवनी योजना, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, ऑरिक सिटी, मराठवाडा वॉटर ग्रीड अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शासनाने मराठवाड्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची वाटचाल सुरू केलेली आहे. मराठवाड्याला दुष्काळ मुक्तीकडे नेण्यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, वृक्ष लागवड मोहीम येथे प्रभावीपणे राबविली. यापुढेही मराठवाड्याला विकास, समृद्धीच्या दिशेने पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

येथील सिद्धार्थ उद्यान येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेशात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी परिवहन, खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, विनायक मेटे, प्रशांत बंब, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक आदींची उपस्थिती होती.

देश स्वतंत्र झाल्यानंतर इंग्रजांनी स्वतंत्र अधिकार संस्थानिकांना दिले. या अधिकाराचा गैरवापर करून निजामांनी हैद्राबाद संस्थानाबाबत निर्णय घेतला. परंतु त्यांच्याविरोधात मराठवाड्याच्या मुक्तीसाठी स्वातंत्र्यसेनानींनी उठाव, संघर्ष केला. बलिदान दिले, त्याचेच फलित म्हणजे आजचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. या दिनी एकसंघ भारत, एक संघ महाराष्ट्र ठेवणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसेनानींसमोर नतमस्तक होतो, असे म्हणत स्वामी रामानंद तीर्थ, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल, सर्व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी यांच्या कार्याला श्री. फडणवीस यांनी अभिवादन केले.

श्री. फडणवीस म्हणाले, मराठवाड्याच्या विकासाला पूरक असणाऱ्या सर्व योजना मराठवाड्यात राबविण्यासाठी शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, यासारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी येथे केली आहे. राज्यातील निर्मित शेततळ्यांपैकी मराठवाड्यात 35 टक्के शेततळ्यांची निर्मिती झाली. देशासाठी व राज्यासाठी महत्त्वाच्या अशा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून 14 प्रकल्पांचे पाणी एकत्रित करून पाइपलाइनद्वारे मराठवाड्यात सर्वत्र पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी भारतातील आधुनिक असे ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ तयार करण्यात येते आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून बळीराजा शेतकरी संजीवनी योजनेतून जवळपास 15 हजार कोटीपेक्षा अधिक निधी मराठवाड्याला देण्यात आलेला आहे. जलयुक्त शिवारचे मराठवाड्यातील काम राज्याला पथदर्शी असेच आहे. ‘मागेल त्याला शेततळी’ अंतर्गत 35 टक्के शेततळी मराठवाड्यात झाली आहेत. या माध्यमातून 60 हजार हेक्टरपेक्षा अधिक संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जंगलक्षेत्र कमी असल्याने मराठवाड्याच्या विकासासाठी वृक्षाच्छादन महत्त्वाचे होते. त्यानुसार मराठवाड्याने यंदा दोन कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिलेले असताना पाच कोटी वृक्षलागवड करून विक्रमच केला आहे. दुष्काळ मुक्तीसाठी ही महत्त्वाचीच पावले आहेत.


नागपूर-मुंबई सुपर एक्सप्रेस वेचा सर्वाधिक फायदा मराठवाडा विभागाला होणार आहे. विशेषत: औरंगाबाद, जालना शहर मराठवाड्यातील उद्योगाचे मॅग्नेट ठरणार आहे. त्यातून मोठी गुंतवणूक होणार आहे. डीएमआयसीसारख्या केंद्राच्या महत्त्वाच्या योजनेतून भारतातील पहिले सर्वसमावेशक असे शहर औरंगाबादेतील (ऑरिक सिटी )शेंद्रा-बिडकीन होते आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आले आहे. या योजनेत अकरा हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. त्यातून तीन लाख रोजगार मराठवाड्यात निर्माण होणार आहे. मराठवाड्यात उद्योग यावेत यासाठी वीजेचे दरदेखील कमी ठेवण्यात आले आहेत. शासनाकडून मराठवाड्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य असल्याचे यावेळी श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शुभेच्छा संदेशानंतर मराठवाड्यातील विविध योजनांचा आणि उपक्रमांचा समावेश असणाऱ्या विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या पुढाकारांनी तयार केलेल्या ‘अग्रेसर मराठवाडा’ या पुस्तिकेचे आणि प्रा.अ. मा. पहाडे यांनी लिहिलेल्या हैदराबाद मुक्ती संग्रामातील ‘माणिक’ या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

सुरूवातीला हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून श्री. फडणवीस व मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलिस दलाकडून तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर स्वातंत्र्यसेनानी, त्यांचे नातेवाईक यांची भेट घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा श्री. फडणवीस यांनी दिल्या. दरम्यान, सुरुवातीला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्प वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले. आणि जालना येथे राज्यपालांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.