Published On : Mon, Nov 26th, 2018

रोजगारभिमुख ‘बहुआयामी गृहस्वास्थ्य सहाय्यक’ अभ्यासक्रमास सुरुवात

ग्रामीण व आदिवासी विभागातील शाळाबाह्य विद्यार्थांना प्रवेशाची संधी

ॲड-मॅपल्स संस्थेचा उपक्रम

नागपूर : विविध कारणांमुळे इयत्ता 8 वी ते 10 मध्ये शाळेचे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी ‘ॲड-मॅपल्स’ संस्थेद्वारे ‘बहुआयामी गृहस्वास्थ्य सहाय्यक’ निवासी अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमात प्रवेशित प्रत्येक विद्यार्थी हा रोजगारभिमुख प्रशिक्षण घेऊन नोकरीच्या संधी प्राप्त करु शकेल, असा विश्वास ‘ॲड-मॅपल्स’ संस्थेच्या प्रमुख श्रीमती डॉ. राजेश्वरी वानखडे यांनी व्यक्त केला आहे.

केंद्र शासनाने 25 कोटी तरुणांना कौशल्यविकास अंतर्गत प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेत अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर देशाने कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्मितीचे केंद्र असा नावलौकीक प्राप्त केला आहे. असे असले तरी उद्योग क्षेत्रात आजही कृत्रिम संसाधनाच्या वापरामुळे कौशल्ययुक्त मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ही बाब लक्षात घेता ‘ॲड-मॅपल्स’ संस्थेने ‘बहुआयामी गृहस्वास्थ्य सहाय्यक’ या अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. या अभ्यासक्रमात दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.

एक वर्षाच्या निवासी ‘बहुआयामी गृहस्वास्थ्य सहाय्यक’ या अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांना नैतिकता, वृत्तीविकास, व्यावसायिकता, मूल्यधिष्ठितता आणि तर्कसंगती या पंचसूत्राची ओळख करुन दिली जाणार असून प्राचीन गुरुकुल पद्धतीचा वापर करुन प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये स्वयंपाकी, स्वच्छता सुश्रुषा, वाहन चालक, संगणक हाताळणी, दैनंदिन नोंदी ठेवणारा उच्च मूल्याधिष्ठित व भावनिक पातळीवर बंध निर्माण करणाऱ्या मनुष्यबळाची ‘बहुआयामी गृहस्वास्थ्य सहाय्यक’ या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अँड-मॅपल्स संस्था निर्मिती करणार आहे.

अँड-मॅपल्स संस्थेद्वारे ‘बहुआयामी गृहस्वास्थ्य सहाय्यक’ अभ्यासक्रमासाठी सल्लागार समिती नियुक्त केली आहे. यामध्ये राज्याच्या पूर्व निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, पी. व्ही. एस. एम. पुणेचे माजी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, नागपूरचे माजी लेफ्टनंट जनरल रविंद्र थोडगे, पुण्याचे माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, नागपूरचे माजी आयएफएस बी. के. सिंह, वरिष्ठ पत्रकार मणिकांत सोनी, सेवानिवृत्त परिवहन अधिकारी शरद जिचकार, पुष्पमाला ठाकूर आदींचा समावेश आहे.

अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अँड-मॅपल्स संस्थेद्वारे जायका, ॲपटेक, ॲसेट फॅसिलिटी सेंटर, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरींग टेक्नॉलॉजी संस्था, नागपूर, राधाबाई बाहेकर नर्सिंग स्कूल तसेच बाहेकर व्यसनमुक्ती केंद्र, गोंदिया, ग्रामपंचायत फेटरी यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. अँड-मॅपल्स संस्थेद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या ‘बहुआयामी गृहस्वास्थ्य सहाय्यक’ अभ्यासक्रमाद्वारे ग्रामीण तसेच आदिवासी भागातील शाळा सोडलेल्या (शाळाबाह्य) विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊन रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास अँड-मॅपल्स संस्थेच्या श्रीमती डॉ. राजेश्वरी वानखडे व प्रा. अनिल वानखडे यांनी व्यक्त केला.