Published On : Mon, Nov 26th, 2018

यंदा वृक्ष लागवडीमध्ये 4 कोटी बांबूची लागवड – सुधीर मुनगंटीवार

Advertisement

10व्या ॲग्रो व्हिजन अंतर्गत ‘बांबू लागवड आणि संधी’ परिषद

नागपूर : ‘बांबू’ हे आधुनिक युगातील कल्पवृक्ष आहे. शेतकऱ्यांसाठी सोने म्हणून गणल्या जाणाऱ्या बांबूची लागवड केल्यास अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व रोजगार अशा मूलभूत गरजा एकाच कल्पवृक्षाच्या माध्यमातून पूर्ण करता येऊ शकतात. त्यामुळे सन 2019 मध्ये राबविण्यात येणाऱ्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या सहकार्याने राज्यात 4 कोटी बांबूची लागवड करण्यात येणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे 10व्या ॲग्रो व्हिजन महोत्सवांतर्गंत ‘बांबू लागवड आणि संधी’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचे राज्यमंत्री गिरीराज सिंग, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार संजय धोत्रे, बांबू लागवड व प्रक्रिया योजनेचे एमबीडीबी टी. एस. के. रेड्डी, बांबू लागवड तसेच औद्योगिक विकासावर कार्य करणारे एफडीसीएम एन रामबाबू, गिरीश गांधी, रमेश मानकर आदी उपस्थित होते.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बांबूच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या महामार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात विशेष करुन विदर्भात बांबूच्या लागवडीवर विशेष भर देण्यात आला आहे. चंद्रपूर येथे सुरु करण्यात आलेल्या बांबू रिसर्च अँन्ड ट्रेनिंग सेंटरची दखल सिंगापूरने घेतली आहे. चंद्रपूर येथे सुरु करण्यात आलेल्या रिसर्च सेंटरची 30 हजार फूट परिसरातील इमारत बांबूपासून तयार करण्यात येत आहे. या इमारत निर्मितीच्या माध्यमातून येथे रोजगाराची साधने उपलब्ध होणार आहे.

अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य तसेच रोजगारासाठी उपयुक्त असणाऱ्या बांबूच्या लागवडीने राज्यात 1 लाख 20 हजार कोटीपेक्षा अधिकचा व्यवसाय होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बांबू आधुनिक युगाचा कल्पवृक्ष व गरिबांचे सोने आहे. या सोन्याचा मानवी जीवनात अधिकाधिक वापर कसा करता येईल. यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात विदर्भात बचत गटांच्या सहकार्याने बांबूपासून अगरबत्ती निर्मिती तसेच टुथपीक तयार करण्याचे उद्योग सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे विदेशातून बांबूची आयात न करता आता अगरबत्तीसाठी बांबूच्या काड्या तसेच टुथपीकसाठी लागणारा बांबू विदर्भात उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

बांबूच्या लागवड क्षेत्राविषयी बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले, बांबू बोर्डाची स्थापना करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. मागील दोन वर्षात देशाच्या 15 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी 4 हजार 465 चौरस किलोमीटर बांबूच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. देशातील 31 राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बांबू लागवड क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांनी जास्तीत -जास्त बांबूची लागवड करावी, यासाठी मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी 2 लाख 3 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. याशिवाय राज्याच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानामध्ये राज्यात सन 2019 मध्ये 4 कोटी बांबूच्या टिशू कल्चर रोपट्याची लागवड करण्यात येणार आहे. बांबूची लागवड करण्यासोबतच त्याला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी विविध कंपन्यांशी करार करण्यात आले आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पादित बांबूला थेट बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचे राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी बांबू लागवडीच्या क्षेत्रात महाराष्ट्रासह बिहार राज्यातही काम केले जात असल्याचे सांगताना म्हणाले, बांबू ही संपदा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मूलभूत गरजा भागविण्यासोबतच त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूची मागणी देशात वाढत आहे. परंतु बांबूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाबरोबर बांबूसाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा सल्ला देत या कार्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय सहकार्य करेल,असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बांबू लागवड आणि संधी याविषयावर प्रकाश टाकला. त्यांनी ॲग्रो व्हिजन महोत्सवाच्या माध्यमातून बांबूच्या उत्पादनाची ओळख व्हावी, यासाठी शासनाद्वारे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचलन श्रीमती रेणुका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन सी. डी. माळी यांनी मानले.