पुणे : संतोष देशमुख खून प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याने आज (31 डिसेंबर) पुण्यातील सीआयडी मुख्यालयात आत्मसमर्पण केले.मात्र पोलीसांना शरण जाण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ केला आहे. या व्हिडिओमधून वाल्मिक कराड याने मोठा खुलासा केला.
बीड जिल्ह्यातील केजच्या मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली. राजकीय आरोपप्रत्यारोपानंतर देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती.
तसंच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचे नाव पुढे आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे.
वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू असल्याने हे प्रकरण विरोधकांनी अधिकच उचलून धरलं. आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून प्रकरणाशी संबंधित लोकांशी चौकशी सुरू झाली आहे. तर सीआयडीने वाल्मिक कराडच्या शोधासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागात पथक देखील रवाना केले होते. मात्र आज वाल्मिक कराड याने स्वत: पुण्यात पोलिसांकडे आत्मसमर्पण केले.
वाल्मिक कराडचा आत्मसमर्पण करण्यापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल-
द्वेषातून माझं नाव या प्रकरणात गोवलं जात असल्याचे कराड याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तसेच संतोष देशमुख यांचे जे मारेकरी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा करण्यात यावी. जर मी या प्रकरणात दोषी आढळलो तर न्याय देवता मला जी शिक्षा देईल ती मला मान्य असेल, असेही त्याने म्हंटले आहे.