चंद्रपूर: चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. मनपा निवडणूक निकालानंतर खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप–प्रत्यारोप अधिकच तीव्र झाले आहेत. दोन्ही नेत्यांची वक्तव्ये आता उघडपणे समोर येत असून, बुधवारी माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी खासदार धानोरकरांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
वडेट्टीवार म्हणाले, “फक्त खासदार झाल्याने कोणी पक्षाचा मालक होत नाही. पक्षाचे खरे मालक हे कार्यकर्ते असतात, एखादा नेता नाही.” गेल्या २५ वर्षांपासून आपण हा जिल्हा सांभाळत असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, स्वर्गीय बाळू धानोरकर यांना आपणच काँग्रेसमध्ये आणले होते. प्रतिभा धानोरकर यांना पक्षात येऊन अवघी सहा वर्षे झाली आहेत. विचारधारेत मतभेद आहेत म्हणून जुन्या कार्यकर्त्यांची तिकिटे कापणे किंवा त्यांना बाजूला सारणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खरे काय ते ‘वन टू वन’ चौकशीत समोर येईल-
वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, त्यांनी कोणत्याही नगरसेवकाला बोलावले नव्हते, उलट काही नगरसेवक स्वतः त्यांच्याकडे आले. काही नगरसेवकांनी तर खासदारांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवून घरी नेल्याचा आरोप केल्याचेही त्यांनी सांगितले. “हाय कमांडने प्रत्येक नगरसेवकाशी ‘वन टू वन’ चर्चा केली तर सत्य समोर येईल,” असे ते म्हणाले.
महापौर पदाचा निर्णय नगरसेवकच घेतील-
मनपा निवडणुकीबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, नगरसेवकांनी प्रचंड मेहनत घेतली, मात्र खासदारांचा त्यात सहभाग नव्हता. तसेच वसंत पुरके यांनी सहा प्रभागांमध्ये उमेदवार बदलण्याचा आग्रह धरला आणि त्यामुळे पक्षाचा पराभव झाल्याचा आरोपही त्यांनी केला. “पक्ष तेव्हाच जिवंत राहतो, जेव्हा कार्यकर्ते जिवंत असतात. नेत्यांनी मालक बनण्याचा प्रयत्न करू नये. चंद्रपूरचा मेयर कोण होणार, हे नगरसेवकच ठरवतील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
लोकसभा तिकीट आणि बी-टीमच्या आरोपांवर उत्तर-
लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, त्यांचे तिकीट निश्चित झाले होते. त्यांनी मुलीसाठी तिकीट मागितले होते, मात्र पक्षाने त्यांनाच निवडणूक लढवण्यास सांगितले. “माझ्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जोरावरच बाळू धानोरकर खासदार झाले, हे कुणी विसरू नये,” असा टोला त्यांनी लगावला.
‘बी-टीम’च्या आरोपांवर पलटवार करताना वडेट्टीवार म्हणाले, “कोण कुणाची बी-टीम आहे, हे सर्वांना माहिती आहे. कुणी गप्प बसले, कुणी सरकारविरोधात आवाज उठवला, हे चंद्रपूरसह राज्यातील जनता जाणते. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.









