
नागपूर : माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेला २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू अखेर खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. शवविच्छेदन अहवालातून या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत तरुणीचे नाव प्राची हेमराज खापेकर (वय २३) असे असून ती प्लॉट क्रमांक ३१, राजलक्ष्मी सोसायटी, प्रसाद विहार मागे, कलेक्टर कॉलनी, गोधनी, माणकापूर येथील रहिवासी होती. १९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास प्राची तिच्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती.
प्राचीच्या आई रुक्मिणी हेमराज खापेकर (वय ५५) यांनी दिलेल्या माहितीनुसार माणकापूर पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, नागपूरच्या मयो रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदनातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार, प्राचीच्या डोक्यावर गंभीर मार लागलेला असून, धारदार अथवा कठीण शस्त्राने हल्ला करून तिची हत्या करण्यात आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. हत्येनंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गळफास घेतल्यासारखा भासवून आत्महत्येचा बनाव केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी राज्यातर्फे पोलीस उपनिरीक्षक उद्धव पोखरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून माणकापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), २३८(अ) आणि २३८(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे यांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे.








