Published On : Tue, Aug 15th, 2017

स्वातंत्र्य व धर्मनिरपेक्षता टिकविण्याच्या लढ्यासाठी सज्ज रहाः खा. अशोक चव्हाण


मुंबई: देशातली सध्याची परिस्थिती पाहता स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवण्यासाठी लढा देण्याची गरज असून काँग्रेसजणांनी या लढ्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, सत्ता हातात असणारे लोक मतांसाठी धार्मिक तेढ वाढवीत आहेत. हिंसाचाराच्या घटना घडवल्या जात आहेत. हे वर्ष माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचे संपूर्ण जीवन काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे, यातून प्रेरणा घेऊन देशाची धर्मनिरपेक्षता आणि स्वातंत्र्यांच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसजणांनी एकजूटीने लढा देण्यासाठी गरज असून त्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे असे आवाहन खा. चव्हाण यांनी केले.


यावेळी विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. नसीम खान, सुरेश शेट्टी, खा. हुसेन दलवाई, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा, आ. भाई जगताप, आ. हुस्नाबानो खलिफे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, पृथ्वीराज साठे, सचिव अल् नासेर झकेरिया, राजाराम देशमुख, प्रवक्ते हरिष रोग्ये, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.