Published On : Sun, Feb 21st, 2021

सावधान, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नागपूर : नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहेत. त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडूच नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सोबतच सोमवारपासून चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्यात येत असून ‘सुपर स्प्रेडर’ असणाऱ्या घटकांना तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गर्दीची ठिकाणे, मंगल कार्यालय, अनिर्बंध वागणाऱ्या नागरिकांवर आता सक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषदेत शनिवारी घेण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये सोमवारपासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक वितरण व सेवेत सहभागी असणारे (सुपर स्प्रेडर) अर्थात अनेकांच्या संपर्कात येणारे भाजीवाले, दुधवाले, सलून, घरकाम करणाऱ्या महिलांच्या चाचण्यांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी विनामास्क बाहेर पडू नये, विनामास्क बाहेर पडणाऱ्यावर सक्त कारवाई करा, असेही स्पष्ट केले आहे. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, डॉ. असीम इमानदार आदी उपस्थित होते.

Advertisement

वारंवार नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई
बैठकीनंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यातील नागरिकांसाठी व्हिडीओ संदेश जारी केला. ते म्हणाले, आपल्याकडे हा संसर्ग पसरतो आहे. हे निश्‍चित आहे. संसर्गाला जर कमी करायचे असेल तर आम्हाला सगळ्यांना स्वयंशिस्त बाळगावी लागेल. कुठल्याही लग्न समारंभामध्ये ५०वर व्यक्ती असतील तर त्या मंगल कार्यालयाच्या विरुद्ध कारवाई करणार आहोत. त्यासोबतच जे वधुपिता असतील त्यांनासुद्धा कारवाईला सामोरे जावे लागेल. याशिवाय हॉटेल्स, रेस्टॉरंट, बारमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोक आढळले तर हॉटेल्सवर कारवाई करू. शासकीय आदेशाची अवहेलना वारंवार करणाऱ्या मंगल कार्यालयाला, हॉटेल, रेस्टॉरंट, बारला काही दिवसांकरिता बंद ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तूर्तास लॉकडाऊन नाही
यावेळी त्यांनी तूर्तास लॉकडाऊन लावणार नसल्याचे सांगितले. बंदमुळे आर्थिक फटका बसू शकतो. यापूर्वी आपण अर्थचक्र बंद झाल्यानंतर सगळेच अडचणींना सामोरे गेलो आहोत. त्याचा अधिक फटका समाजातल्या आर्थिक दुर्बल घटकांना बसतो. त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सकारात्मकरीत्या प्रतिसाद द्यावा. शाळा-कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी असतील, शिक्षक, प्राध्यापक असतील त्यांनी कोरोनासारखी लक्षणे असतील तर मोफत आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. शाळा-कॉलेजेसमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करणे मुख्याध्यापक, प्राचार्य यांची जबाबदारी असेल. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग करून घेतले पाहिजे आणि लक्षणे असतील तर त्याला शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रवेश देऊ नये. जिल्ह्यात कोरोना वाढतो आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाला सर्वतोपरी साहाय्य करावे, असे आवाहनही त्यांनी आपल्या संदेशात केले आहे.

तालुका स्तरांवर सभा
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही वाढत्या संकटामुळे आता प्रत्येक मोठ्या गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे करण्यासाठी २२ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद सदस्य, तसेच जिल्हा परिषद सदस्य यांनादेखील या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहेत. २२ तारखेला नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर, नागपूर ग्रामीण या ठिकाणी तर २३ला हिंगणा, कामठी, मौदा, कुही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. सहवासितांचा शोध मोहिमेचे नियोजन, तपासणी संख्या वाढविणे, कोविड केअर सेंटर कार्यान्वित करणे, सुपर स्पेडर तपासणी व मृत्यूसंदर्भातील अन्वेषण करण्याबाबत या बैठकांमध्ये निर्देश दिले जाणार आहेत.

शाळा-कॉलेजसाठीही निर्देश जारी
जिल्ह्यात नुकतेच शाळा-कॉलेज सुरू झाली असून या ठिकाणी कोविड प्रोटोकॉलनुसार सूचनांचे पालन होते, अथवा नाही याची खातरजमा करण्याबाबतही जिल्हाधिकारी निर्देशित केले आहेत. शाळेत विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्यास शाळा-महाविद्यालय दहा दिवसांसाठी बंद ठेवावीत. संपूर्ण इमारत वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करून घ्याव्यात. याबाबत संबंधित तहसील कार्यालय, नियंत्रण कक्ष, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांना कळवावे. संबंधित विद्यार्थ्यांच्या जवळच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. शाळा-महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर थर्मल गनद्वारा विद्यार्थ्यांचे तापमान घेण्यात यावे, आदी सूचना आदेशात करण्यात आल्या आहेत.

असे आहेत आदेश
– मंगल कार्यालय, रिसोर्ट, लॉनवर कारवाई होणार
– ग्रामीण भागात सोमवारपासून चाचणींची संख्या वाढवणार
– खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार
– प्रवास करून आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन
– उपाययोजना नसतील तर शाळा-महाविद्यालये बंद ठेवा
– मॉल्ससह सर्व प्रकारची दुकाने, रेस्टॉरंट, मैदानात गर्दी नको
– कामठी, काटोल, सावनेर या शहरावर विशेष लक्ष
– सुपर स्पेडरची तपासणी करण्यासाठी विशेष अभियान

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement