Published On : Sun, May 31st, 2020

बीडीओ सचिन सुर्यवंशीच्या गांधीगिरीने अखेर तो राजकीय कार्यकर्ता ओसाळला

कामठी :-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा गेली दोन अडीच महिने राबत आहे. इतके दिवस शहर महानगरात मुक्काम केलेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागात पाय पसरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिकच सजग झाली आहे. गावखेड्यात बाहेरून विशेषतः रेड झोनमधुन आलेल्या प्रवाशांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश आहेत. त्यानुसार वडोदा ग्रामपंचायतीने बाहेरील राज्यातून आलेल्या एकुण पाच प्रवाशांना क्वारंटाईन करून ठेवले होते. त्यांच्या निवासासह जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक आरोग्य कर्मचा-यांनी त्यांच्या नोंदीही घेतल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली एवढे सगळे सुरळीत पार पडेल आणि त्यात राजकारण आड येणार नाही असे घडणेच दुरापास्त.

गावातील एका अतिउत्साही युवा कार्यकर्त्याने क्वारंटाईन केलेल्या प्रवाशांना पुरेशा सुविधा नसल्याची बोंब ठोकत अनधिकृतपणे प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केला. तेथील प्रवाशांना खोटी माहीती देऊन त्यांची दिशाभूल केली व त्यांना अगदी बिनधास्तपणे घरी जा म्हणुन सांगितले. कर्मचा-यांनी विरोध केला असता त्यांच्याशी हुज्जत घातली. हे सर्व मी माझ्या ‘रिस्क’वर करत असल्याचे तारेही या कार्यकर्त्याने तोडले. विशेष म्हणजे या प्रवाशातील एकजण अतिजोखीमग्रस्त भागातून आलेला होता.

Advertisement

हा सर्व प्रकार वडोद्याच्या सरपंच विनिता इंगोले यांनी कामठीचे बीडीओ सचिन सुर्यवंशी यांना सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सुर्यवंशी यांनी विस्तार अधिकारी मनिष दिघाडे यांचेसह थेट वडोदा गाठले. तोपर्यंत पोलिसही तिथे पोचले होते. गावातील गलिच्छ राजकारण पाहून उद्विग्न झालेल्या बीडीओ सचिन सुर्यवंशी यांनी पोलिसांकरवी त्या युवा कार्यकर्त्याला जिल्हा परिषद शाळेत बोलावून घेतले आणि चक्क शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला.

आणि त्याच्यापुढे नतमस्तक झाले. बीडीओंच्या या गांधीगिरीने तो कार्यकर्ता पुरता ओशाळून गेला. यापुढे असे अनाठायी धाडस कुणी करू नये म्हणुन या कार्यकर्त्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही दिले. त्याच्या या “सत्कार’ कार्यक्रमाला सरपंच श्रीमती इंगोले, उपसरपंच श्री. विशाल चामट, तलाठी श्री. अविनाश दुर्योधन, आरोग्यसेविका श्रीमती शेंडे यांचेसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement