Published On : Sun, May 31st, 2020

नागरिकांनी आता जीवनपद्धती बदलावी

Advertisement

फेसबुक लाइव्हमध्ये मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

नागपूर: कोरोनापासून आपण धडा घेउन आपली जीवन पद्धती यापुढे बदलविण्याची गरज आहे. येणा-या काळात आपल्याला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. सोशल डिस्टंसिंग, फेस मास्क आणि स्वच्छता या गोष्टींचे आपल्याला प्रत्येक वेळी पालन करायचे आहे नव्हे त्याची सवयच लावून घ्यायची आहे. त्या पद्धतीने आपले राहणीमान बदलवा असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केले.

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या चवथ्या लॉकडाउनची मुदत उद्या रविवारी ३१ मे रोजी संपणार आहे. या लॉकडाउननंतर पुढे काय? नागरिकांच्या मनातील या प्रश्नावर मनपा आयुक्तांनी शनिवारी (ता.३०) फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

ते म्हणाले, पुढील काळात लॉकडाउन शिथिल होवो अथवा न होवो नागरिकांना आपल्या सवयी बदलण्याची गरज आहे. येत्या काळात सार्वजनिक वाहतूक, हॉटेल रेस्टॉरेंट आदी सर्व सुरू झाल्यास त्यामध्ये पूर्वीसारखी आपली वागणूक बंद करावी लागणार आहे. बस किंवा ऑटोमधून प्रवास करताना तिथे गर्दी होणार नाही, सोशल डिस्टंसिंगचे पालन होईल, मास्क वापरूनच प्रवास करण्यात येईल, सॅनिटायजरचा वापर होईल ही सर्व काळजी आपल्याला घ्यायची आहे. बस मध्ये किंवा ऑटोमध्ये बसताना बस किंवा ऑटो चालकाला सॅनिटायजिंग झाले अथवा नाही हे विचारपूस करूनच प्रवास करायचा आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरेंटमध्ये जाताना तिथेही संपूर्ण सॅनिटायजिंग झाले अथवा नाही याची खातरजमा करून घ्यावी. स्वत:ही नियमीत मास्कचा वापर, सॅनिटायजर आणि वारंवार हात धुणे या सवयी अंगिकारणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

नागपूरात कोरोनाची जी परिस्थिती आहे ती संपूर्ण टिमचे यश आहे. या काळात आलेले अपयश असेल किंवा काही चूक झाली असेल तर ती आयुक्त म्हणून माझी आहे. पण जे काही यश आले आहे आणि येणार आहे ते संपूर्ण टिमचे आहे. या टिममध्ये शहरातील सफाई कर्मचारी, आशा वर्कर, पोलिस प्रशासन ते शहरातील सर्व विभागांच्या लहानात लहान कर्मचा-यांपासून मोठ्या अधिका-यांपर्यंत सर्वांचे मोठे योगदान आहे, असेही ते म्हणाले.

डॉक्टर आणि रुग्णांसोबत सामाजिक बहिष्कार योग्य नाही

कोरोनाच्या या संकटामध्ये डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचारी अविरत सेवा बजावत आहेत. रुग्णांवर उपचार करून घरी येणा-या डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी या कोरोना योद्ध्यांशी सामाजिक बहिष्काराची वागणूक दिली जाते. याशिवाय कोरोनामुक्त होउन घरी परतलेल्या रुग्णांशीही बहिष्काराने वागले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर नागरिकांनी या सर्वांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार लादणे योग्य नाही, असेही आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.

याशिवाय खाजगी रुग्णालयांमध्ये येणा-या ताप, न्यूमोनिया किंवा खोकला असलेल्या रुग्णांचे ‘स्वॅब’ घेउन त्याची माहिती मनपाला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांनीही स्वत: पुढाकार घेउन रुग्णांची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. नागपूर बाहेरुन येणा-यांना शहरात भाड्याने घर देण्याच्या प्रश्नावर बोलताना आयुक्त म्हणाले की, शहरात येणा-या लोकांना भाड्याने घर देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या दिशानिर्देशानुसार बाहेरुन येणा-या नागरिकांनी स्वत: १४ दिवस होम क्वारंटाईन मध्ये राहाणे गरजेचे आहे. आपल्याकडे राहायला येणा-या व्यक्तीने सोशल डिस्टंसिंग व इतर अन्य सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करवून घेण्यात यावे, असेही ते म्हणाले.

माझी भूमिका शासनाच्या निर्देशानुसार लोकांच्या कल्याणासाठी काम करणे ही आहे. आजपर्यंत हीच भूमिका बजावत आलोय आणि पुढेही असेच काम करत राहणार आहे. ‘ग्राउंड लेव्हल’वर नेहमीच काम करत आलोय आणि पुढेही ते सुरू राहणार आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढ दिसून येताच सतरंजीपुरा, मोमीनपुरा भागात जावून स्वत: तेथील सुरू असलेली दुकाने बंद करून घेतली. दरवर्षी साफ होणारी नाग नदी पुनर्जीवित करण्याचे काम केले. शहरातील तिनही नद्या, रस्ते, उद्यान, वीज सर्व सुविधा उत्तम करण्यासाठी काम सुरू आहे, असेही आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.