Published On : Thu, Jun 28th, 2018

बाजारातून मनपाचे उत्पन्न वाढविणारा अंमलबजावणीयोग्य आराखडा तयार करा !

नागपूर : नागपूर शहरातील मनपाने लीजवर दिलेल्या बाजारातील दुकानांची आणि परिसरातील स्थिती वाईट आहे. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही. अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. यासंपूर्ण बाजारांचा पुन्हा एकदा सर्वे करून आवश्यक बाबींचा तपशील मांडण्यात यावा. याच बाजारांतून मनपाचे उत्पन्न वाढेल, असा अंमलबजावणीयोग्य प्रशासकीय आराखडा तयार करा, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

नागपूर शहरातील बाजारांची सुस्थिती व दुरुस्ती, अधिकृत व अनाधिकृत बाजार, दुकाने तसेच बाजार व दुकानांद्वारे मिळणारे भाडे वसुली याबाबत माहिती घेण्याच्या दृष्टीने मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मनपाती सत्तापक्ष उपनेते बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त विजय हुमणे उपस्थित होते.

यावेळी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी गोकुळपेठ, महात्मा फुले मार्केट, सुभाष रोड मार्केट, न्यू एस.टी. स्टॅण्ड मार्केट, कमाल चौक मार्केट, मंगळवारी मार्केट यासह अन्य बाजारांमध्ये असलेली एकूण दुकाने किती, त्यातील किती दुकाने रिक्त आहेत, त्यावर कोणाचे अतिक्रमण आहे का, रिक्त दुकानांसाठी जाहिरात काढली आहे का, या सर्व बाबींचा त्यांनी आढावा घेतला. सहायक आयुक्त (बाजार) विजय हुमणे यांनी याबाबतची माहिती सभापती व पदाधिकाऱ्यांपुढे मांडली. यातील जे दुकानदार किराया देत नाही त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, बाजारात ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यात यावे. ज्यांच्या नावे दुकान देण्यात आले आहे, त्याच दुकानदाराने तेथे दुकान थाटले आहे काय, याबाबतची सविस्तर माहिती गोळा करण्यात यावी, असे निर्देशही सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

जेथे बाजार आहे तेथे महानगरपालिकेतर्फे सर्व सुविधा पुरविण्यात याव्या, सर्व बाजारांची देखरेख योग्य प्रकारे करण्यात यावी, साफसफाई नियमित करण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले. बाजारांतील गाळेधारकांकरून वसूल करण्यात येणाऱ्या किरायासंदर्भात ‘पॉलिसी’ बनविण्याचे निर्देशही सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.