Published On : Thu, Feb 2nd, 2023

तो भाजपचा उमेदवार नव्हताच; पराभवानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

Advertisement

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या ५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत दोन जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. दरम्यान, या पराभवानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांचा महाविकास आघाडी पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी पराभव केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा विजय झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

नागपूरची जागा आम्ही कधीच लढत नाही. ती शिक्षक परिषद लढते. भाजपने त्यांना फक्त पाठिंबा दिला होता. तो पराभूत उमेदवार भाजपचा नव्हता. यावर विरोधी पक्षाने हुरळून जाऊ नये, असा टोला चंद्रशेख बावनकुळे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे. ते मुंबईत बोलत होते.

या निकालातून आत्म परीक्षण करावे असे काही नाही. नागपुरात निवडणुकीत भाजपचा उमेदवार असता, तर ही जागा आम्ही नक्कीच जिंकली असती. कोकणमध्ये आम्ही जिंकलो आहोत. अमरावतीमध्ये अजून ८० हजार मते मोजायची आहेत. आम्ही मतमोजणीची वाट बघू असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

अजित पवार डोळ्यात अंजन घातले पाहिजे. विक्रम काळे यांचा मागच्या वेळचा निकाल बघावा, असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देखील टीका केली आहे. नाना पटोले या निकालाने हुरळून गेले. या विजयातून कुणाचे नुकसान झाले नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.