
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात आयोजित महायज्ञानंतर माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसच्या सत्ताकाळात तब्बल 28 वेळा पेपरफुटीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे विरोधकांनी आधी स्वतःचा इतिहास तपासावा. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची जाणीव सरकारला असून, घटना उघडकीस येताच केंद्र सरकारने तातडीने कारवाई केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत काही राजकीय कार्यकर्ते आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशयही बावनकुळे यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. “सत्ता उलथवून टाकण्याच्या घोषणा करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करावे. आधी स्वतःचे उरलेले आमदार, खासदार आणि नगरसेवक सांभाळावेत,” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे स्वागत करत, विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांची भेट घेणे ही लोकशाही परंपरा असल्याचे बावनकुळे म्हणाले. या भेटीला अनावश्यक राजकीय रंग देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राच्या विकासासाठी फडणवीस यांना अधिक ऊर्जा मिळावी, अशी प्रार्थना करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून श्रद्धांजलीही वाहण्यात आली.




