Published On : Thu, Jul 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नको महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सक्त निर्देश

कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना मंत्रालयातून जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हीसीव्दारे बैठक १७ लाख शेतकऱ्यांच्या यादीनंतर दुसरी यादी पंधरा दिवसात
Advertisement

मुंबई: महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, या योजनेची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी. कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नये, असे सक्त निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मंत्रालयातील महसूलमंत्र्यांच्या दालनात सहकार आणि महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे हेदेखील उपस्थित होते.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. कोणताही पात्र कर्जदार शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. या योजनेत प्रामुख्याने कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना (OTS) आणि प्रोत्साहनपर लाभ अशा तीन घटकांचा समावेश आहे. यातून राज्यातील सुमारे ३२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा, तर नियमित कर्ज भरणार्‍या २४ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात १७ लाख कर्जखाती
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास १७ लाख (१६.९६ लाख) कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांची ७.०३ लाख तर व्यापारी बँकांची ९.९३ लाख कर्जखाती आहेत. तर दुसरी यादीही पुढील पंधरा दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

थकबाकीच्या रकमेतील तफावतीवर तोडगा
गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये व्यापारी बँकांमधील एनपीए (NPA) खातेदार शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेली थकबाकी रक्कम आणि योजनेच्या पोर्टलवरील रक्कम यात काही ठिकाणी तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना प्रवीण दराडे म्हणाले, अशी तफावत असल्यास योजनेच्या ‘पोर्टलवरील’ ३१ मार्च २०२६ पर्यंतची थकबाकीची रक्कम ग्राह्य धरण्यात यावी. तसेच, १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज न आकारण्याच्या शासनाच्या सूचनांना सर्व बँकांनी लेखी संमती दिली आहे.

अशी असेल कर्जमुक्तीची प्रक्रिया
•आधार प्रमाणीकरण – पोर्टलवर दिसणारी रक्कम मान्य असल्यास शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करावे. प्रमाणीकरण यशस्वी झाल्यावर त्यांना कर्जमुक्तीच्या रकमेची माहिती असलेली पावती मिळेल.
•थेट बँक खात्यात रक्कम (DBT) – त्यानंतर ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या कर्जबाकीच्या लाभाची रक्कम डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाईल.
•कर्ज बेबाकी प्रमाणपत्र व नवीन पीककर्ज – कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यास ‘कर्ज बेबाकी प्रमाणपत्र’ देण्यात येईल. यानंतर या सर्व शेतकऱ्यांना बँकेमार्फत आगामी खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्जाची उपलब्धता होईल.
•याद्यांची प्रसिद्धी – कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकांच्या शाखा आणि विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये (V.K.S.) लावल्या जातील.

तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती
जर एखाद्या शेतकऱ्याला पोर्टलवरील रक्कम किंवा कर्जाबाबतचा इतर कोणताही तपशील अमान्य असेल, तर तो पोर्टलवरच आपली तक्रार नोंदवू शकतो. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी थेट जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती काम पाहणार आहे.

बँकांसाठी विशेष सवलत (हेअर कट)
शेतकऱ्यांचे कर्जखाते अनुत्पादित (एनपीए) झाले असल्यास, बँकांना थकीत कालावधीच्या टप्प्यानुसार विशेष सवलत (हेअर कट) दिली जाणार आहे. त्याची तडजोड रक्कम खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे:
अनुत्पादक कर्जाचा दिनांक व तडजोडीची रक्कम:
• दि. ३०/०९/२०२१ किंवा त्यापूर्वी: कर्जबाकीच्या ३५ टक्के
• दि. ०१/१०/२०२१ ते ३०/०९/२०२२: कर्जबाकीच्या ४५ टक्के
• दि. ०१/१०/२०२२ ते ३०/०९/२०२३: कर्जबाकीच्या ५५ टक्के
• दि. ०१/१०/२०२३ ते ३०/०९/२०२४: कर्जबाकीच्या ७० टक्के
• दि. ०१/१०/२०२४ ते ३०/०९/२०२५: कर्जबाकीच्या ८५ टक्के

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.