नवी दिल्ली : सोशल मीडियावर रील बनवून किंवा व्हिडिओ तयार करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्यांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. केवळ स्वतःला पत्रकार घोषित केल्याने मान्यताप्राप्त पत्रकारांप्रमाणे कायदेशीर संरक्षणाचा दावा करता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदवले. त्यामुळे रीलस्टार आणि कंटेंट क्रिएटर्सच्या पत्रकारितेच्या दाव्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनादरम्यान दिल्लीतील पत्रकारांशी झालेल्या कथित गैरवर्तनासंदर्भातील प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी पत्रकार कोणाला म्हणायचे आणि त्यांची ओळख कशी निश्चित करायची, यावर महत्त्वाचे निरीक्षण मांडले.
स्वतःला पत्रकार म्हणवून घेणे पुरेसे नाही-
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी स्पष्ट केले की, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि ऑनलाइन माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांची ओळख संबंधित संस्थांच्या माध्यमातून निश्चित होऊ शकते. मात्र, सध्याच्या काळात अनेकजण स्वतःहून पत्रकार असल्याचा दावा करतात. अशा स्वयंघोषित पत्रकारांना मान्यताप्राप्त पत्रकारांप्रमाणे समान संरक्षण देता येणार नाही, अशी तोंडी टिप्पणी त्यांनी केली.
दरम्यान, आंदोलनाच्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेले रील बनवणारे आणि कंटेंट क्रिएटर्स यांना मान्यताप्राप्त पत्रकारांप्रमाणे संरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका दिल्ली पोलिसांनीही न्यायालयात मांडली होती.
प्रेस स्वातंत्र्य आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर-
या प्रकरणात पत्रकारितेचे स्वातंत्र्य जपणे आणि त्याचवेळी सार्वजनिक ठिकाणी कायदा-सुव्यवस्था कायम ठेवणे, या दोन्ही बाबींमध्ये संतुलन राखणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती बागची यांनी नमूद केले.
तसेच आंदोलनांचे वार्तांकन करताना पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबत आवश्यक परिस्थिती निर्माण झाल्यास न्यायालय हस्तक्षेप करेल, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सूचित केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर पत्रकारितेच्या नावाखाली सक्रिय असलेल्या रील क्रिएटर्स आणि कंटेंट क्रिएटर्स यांच्या अधिकारांचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र, न्यायालयाने ही टिप्पणी सुनावणीदरम्यान केली असून, सर्व डिजिटल पत्रकार किंवा कंटेंट क्रिएटर्सना सरसकट कायदेशीर संरक्षण नाकारल्याचा अंतिम निर्णय दिलेला नाही.




