नागपूर : उच्च न्यायालयाने नायलॉन मांजा विरोधात जनहित याचिकांवर दिलेल्या आदेशानंतर नागपूर महापालिका ॲक्शन मोडवर आली.यामुळे शहरातील पतंगबाजांना मोठा फटका बसला आहे.नुकतेच नायलॉन मांज्याबाबत महापालिका आणि पोलिस विभागाकडून कारवाईचे आश्वासन उच्च न्यायालयात देण्यात आले. यामुळेच आता नायलॉन मांजाबाबत महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. नायलॉन मांजाच्या वापराला आळा घालण्यासाठी महापालिकेने व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला असून, कुठेही नायलॉन मांजाची विक्री, वापर किंवा साठवणूक आढळल्यास व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेने जनतेला व्हॉट्सॲप क्रमांक 8600004746 वर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांना महापालिकेच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील @ngpnmc आणि ट्विटरवर @ngpnmc या अधिकृत खात्यांवर तक्रार करता येणार आहे.
महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार, महापालिकेने जारी केलेल्या सूचनांनुसार, नायलॉन मांजा केवळ मानवांसाठीच नव्हे तर प्राण्यांसाठीही घातक आहे. त्यामुळे दरवेळी काही ना काही अप्रिय घटना समोर येत आहे. याआधीही विशेषत: बंदी असलेल्या नायलॉन मांजाच्या बाबतीत कडक कारवाई करण्यात आली होती, मात्र सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन विक्रीमुळे या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
अशा परिस्थितीत नायलॉन मांजाचे विक्रेते, वापरकर्ते आणि दुकानांवर कडक कारवाई केली जाईल. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने सिंथेटिक/प्लास्टिक नायलॉनवर कारवाई सुरू केली असून, शहराला नायलॉन मांजापासून मुक्त ठेवण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. न्यायालय आणि पर्यावरण (संरक्षण) कायद्यानुसार मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.