नागपूर – शहरात ड्रोन उडवण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. शहरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी १७ दिवसांसाठी हा आदेश लागू केला आहे.
हा आदेश ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर घेण्यात आला असून, शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, दीक्षाभूमी यांसारख्या संवेदनशील भागांमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही पावले उचलण्यात आली आहेत. पोलीस विभागाच्या मते, काही समाजविघातक घटक ड्रोनचा गैरवापर करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादाविरोधात यशस्वी मोहीम चालवली असून, पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आले होते. त्यावरून शिक्का मारत नागपूरमध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी दक्षता घेण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आला असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.