Published On : Wed, Aug 28th, 2019

लहान मुलांच्या कलेला वाव मिळण्याकरिता बालरंगभूमी परिषद उपयुक्त ठरेल

महापौर नंदा जिचकार यांचा विश्वास : बालनाट्य महोत्सवाचे थाटात उद्घाटन

नागपूर : लहान मुलांमध्ये कोणत्याही स्वरूपात काहीतरी कला दडलेली असते. त्यांच्यातील कलेला जर वाव मिळाला तर भविष्यात खूप मोठे यश संपादन करू शकतात. लहान मुलांच्या कलेला वाव मिळण्याकरिता बालरंगभूमी परिषद ही उपायुक्त ठरेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिका आणि बालरंगभूमी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बालनाट्य महोत्सवाचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर बालरंगीभूमी परिषदेचे अध्यक्ष मधुरा गडकरी, उपाध्यक्षा आभा मेघे, सीमा फडणवीस, नरेश गडेकर, श्रीकांत गडकरी, नाना मिसाळ, रोशन नंदवंशी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत लहान मुलांच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सततच्या शाळेचे वेळापत्रक व त्यानंतर शिकवणी यातून मुलांना आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी फारसा वेळ उपलब्ध नसतो, या अशा प्रकारच्या माध्यमातून लहान मुलांना त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल यात काही दुमत नाही.

बालरंगभूमी परिषदेतर्फे २५ ऑगस्ट रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बालनाट्य महोत्सवात अशा एका शनिवारी, झाडी वाली झुंबी, घरटं या तीन नाटकांची प्रस्तुती करण्यात आली. या तिन्ही नाटकाच्या दिग्दर्शकांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.


प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. गणेशवंदना यावर नृत्य् सादर कऱण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभा मेघे यांनी केले. मधूरा गडकरी यांनी बालरंगभूमी परिषदेमागील भूमिका व उद्देशाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन वैदेही चवरे यांनी केले तर आभार संजय वलीवकर यांनी मानले.