Published On : Wed, Aug 28th, 2019

नागरिकांना आवश्यक मुलभूत सुविधा तातडीने पुरवा : तारा (लक्ष्मी) यादव

Advertisement

गलिच्छ वस्ती निर्मूलन सभापतींनी दिली आकस्मिक भेट

नागपूर : स्वच्छ पाणी, वीज, रस्ते व परिसरात स्वच्छता या मुलभूत गरजा आहेत. मात्र या समस्यांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो. शासन व मनपातर्फे झोपडपट्टीतील रहिवास्यांना पक्के घरे देण्यात आले. या ठिकाणी मुलभूत सुविधा हे सुद्धा मनपाचेच कर्तव्य आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक मुलभूत सुविधा तातडीने पुरविण्यात याव्यात, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी दिले.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण अभियान (जेएनएनयूआरएम) अंतर्गत शहरी गरीबांची मूलभूत सेवा (बीएसयूपी) प्रकल्पाद्वारे मौजा नारी येथे बांधण्यात आलेल्या सदनिका शहरातील झोपडपट्टीवासीयांना देण्यात आल्या आहेत. या सदनिकेमध्ये मुलभूत सुविधांच्या तक्रारीबाबत रहिवास्यांकडून देण्यात आलेल्या निवेदनावर बुधवारी (ता.२८) गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या सभापती तारा (लक्ष्मी) यादव परिसरात आकस्मिक भेट देउन समस्यांची पाहणी केली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दौ-यामध्ये समितीचे उपसभापती सुनील हिरणवार, समिती सदस्या रूतिका मसराम, उपअभियंता (एसआरए) पंकज पाराशर आदी उपस्थित होते.

यावेळी गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांच्यासह उपसभापती सुनील हिरणवार, समिती सदस्या रूतिका मसराम यांनी सदनिकेतील रहिवाशी नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या ऐकूण आवश्यक ते निर्देश प्रशासनाला दिले.

मौजा नारी येथे २३४ सदनिका बांधण्यात आल्या असून यापैकी २१० सदनिकांचे वितरण झाले आहे. यामध्ये सद्या ११० कुटुंब वास्तव्य करीत आहेत. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी योग्य रस्ता, विद्युत व्यवस्था, पिण्याचे पाणी व घाणीचे साम्राज्य असल्याच्या तक्रारी नागरिकांमार्फत करण्यात आल्या.

स्वच्छतेअभावी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबत तातडीने दखल घेउन स्वच्छता कर्मचा-यांची चमू पाठवून सफाई करवून घेण्याबाबत आसीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्याशी फोनवर संवाद साधून गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी कार्यवाहीचे निर्देश दिले. मौजा नारी येथील सदनिकेमध्ये सुमारे ११० कुटुंब वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी, कचरा इतरत्र न टाकता तो कचरा पेटीमध्ये जमा करण्यात यावा. यासाठी मनपातर्फे सदनीकेपुढे ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा यादृष्टीने कचरापेट्या ठेवण्यात याव्यात, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे उपसभापती सुनील हिरणवार यांनीही यावेळी दिले.

सदर सदनिकेकडे जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था नाही. प्रस्तावित रस्त्याबाबत कोणतिही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पर्यायी मार्गाने नागरिकांना ये-जा करावे लागते. मात्र हा मार्ग पूर्णत: खराब असून या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली. सदनिकेमध्ये जाण्यासाठी प्रस्तावित रस्ता तातडीने तयार करण्याची गरज असून याबाबत येणा-या अडचणी विभागाला सांगण्यात याव्यात या अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचवून त्या दूर करण्याचा प्रयत्न समितीमार्फत करण्यात येईल. याशिवाय तात्पुरत्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मनपाच्या हॉटमिक्स विभाग व कार्यकारी अभियंता सिमेंट रोड टप्पा १,२,३ यांना पत्र देउन तातडीने कार्यवाही करण्याचेही निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापतींनी दिले.