नागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता भाजपा नेते मुन्ना यादव व त्यांचे बंधू बाला यादव यांना खुनी हल्ला प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज खारीज करण्यात आले. न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी हा निर्णय दिला.
ही घटना २१ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री घडली होती. फिर्यादी अवधेश ऊर्फ पापा नंदलाल यादव यांच्या तक्रारीनुसार, मुन्ना यादव यांची मुले करण व अर्जुन फटाके फोडत असताना त्यांना फिर्यादीच्या कुटुंबातील मंजू यादव यांनी हटकले. त्यामुळे मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांनी फिर्यादीच्या कुटुंबीयांना शस्त्राने जखमी केले. तसेच, जबर मारहाण व शिवीगाळ केली. जखमींमध्ये सत्यप्रकाश ऊर्फ मंगल नंदलाल यादव, प्रदीप ऊर्फ गब्बर नंदलाल यादव, मंजू संतोष यादव व अवधेश यादव यांचा समावेश आहे. धंतोली पोलिसांनी मुन्ना यादव, लक्ष्मी यादव, करण यादव, अर्जुन यादव, बाला यादव, जग्गू यादव, सोनू यादव व इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला. गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रही दाखल केले आहे. आरोपींतर्फे अॅड. उदय डबले यांनी बाजू मांडली.